शहादा डेपोची बस आगीत खाक, छत्रपती संभाजीनगर-धुळे हायवेवर भयानक दुर्घटना, नेमकं काय झालं, वाचा…

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर – धुळे महामार्गावर मंगळवारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शहादा आगाराची शहादा–संभाजीनगर बस अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाली. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारात एका हॉटेलजवळ उभी असताना या बसला आग लागली होती. सुदैवाने बसमधील सर्व ४८ प्रवासी जेवणासाठी खाली उतरलेले असतानाच ही घटना घडल्याने या सर्वांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची बस (क्र. एमएच १५ जेसी ५४९३) शहादा येथून संभाजीनगरकडे जात होती. खुलताबाद तालुक्यातील हॉटेल आम्रपाली परिसरात सायंकाळी सुमारे ४.२० वाजेच्या सुमारास प्रवाशांच्या जेवणासाठी ही बस थांबली होती. याचवेळी वाहकाच्या बाजूच्या मागील टायरचा अचानक स्फोट झाला. टायर फुटल्यानंतर काही क्षणातच बसला आग लागली आणि आग वेगाने पसरली.
घटनेची चाहूल लागताच चालक आणि वाहक यांनी तत्परतेने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे बसमध्ये प्रवास करणारे एकूण ४८ प्रवासी सुरक्षित बचावले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र आग वेगाने भडकत गेल्याने संपूर्ण बस काही वेळातच जळून खाक झाली.
या घटनेची चौकशी कन्नड डेपोमार्फत सुरू असून, शहादा डेपोचे व्यवस्थापक भोये यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि चालक-वाहकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, ही बस शहादा येथून सातत्याने धावत असते. त्यातच सध्या अचानक उष्णता वाढल्याने रस्त्यावर घर्षण वाढल्याने टायरने पेट घेतल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




सल्लूभाई, बहुत बढिया है,, kkeep it up,, best luck