नंदुरबारमध्ये माजी आमदारांचे उपनगराध्यक्ष पुत्र, दोन नातेवाईक नगरसेवकांसह चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; महिलेला जातीवाचक शिविगाळ करणे पडले महागात
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पतीच्या नातेवाईकाच्या लग्नाला आलेल्या महिलेला तेथून परतताना अडवून जातीवाचक शिविगाळ करणे नंदुरबारचे उपनगराध्यक्ष प्रथमेश शिरिष चौधरी यांच्यासह चौघांना महागात पडले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले चौघेही अमळनेरचे माजी आमदार शिरिष चौधरी यांचे नातेवाईक असून, त्यात प्रथमेश चौधरी हे पूत्र आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ मार्च रोजी घडली होती. मात्र, महिलेने उशीरा तक्रार दाखल केल्याने ७ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र हिरालाल चौधरी (नगरसेवक, नंदुरबार नगरपालिका), प्रथमेश शिरिष चौधरी (उपनगराध्यक्ष), गौरव नरेंद्र चौधरी (स्वीकृत नगरसेवक, न.प.) व प्रशांत कन्हैयालाल चौधरी ऊर्फ भैय्या सोडा चौधरी (सर्व रा. चौधरी गल्ली, नंदुरबार) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.
पीडित महिला १ मार्च रोजी पतीच्या नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट येथे गेली होती. काही वेळ या सोहळ्यात उपस्थित राहिल्यानंतर मुलगा रडू लागल्याने सदरील महिला पतीसह बाबा रिसॉर्टच्या एक्झिट गेटमधून बाहेर पडत होती. त्याचवेळी तेथे पोहोचलेल्या संशयित आरोपींनी या दाम्पत्याला गाठून पीडितेला लग्न सोहळ्यासाठी का आली, असा जाब विचारला. तसेच तिच्या जातीचा उल्लेख करून शिविगाळ करीत तिचा अवमान केला, असा आरोप या महिलेने फिर्यादीत केला आहे. ही फिर्याद ७ मार्च रोजी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी दाखल करण्यात आली. यावरून नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३ (५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन करीत आहेत.
दरम्यान, माजी आ. शिरिष चौधरी यांच्या उपनगराध्यक्ष पुत्रासह दोन नातेवाईक नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाल्याने नंदुरबार शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.



