धक्कादायक : शहाद्यात एचडीएफसी बँकेच्या लालची मॅनेजरकडून सेवानिवृत्त प्राचार्यांसह दोघांना ५० लाखांचा गंडा; ‘एफडी’ची रक्कम परस्पर शालकासह त्याच्या मित्राच्या खात्यात वळवली!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नामांकित एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेच्या व्यवस्थापकाने दोन सेवानिवृत्तांना तब्बल ४९ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार शहादा येथे उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये एका सेवानिवृत्त प्राचार्यांचा समावेश असून, आता संबंधित बँक व्यवस्थापक, त्याचा शालक व शालकाचा मित्र अशा तिघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद नरोत्तम पाटील (७७, रा. कमलताई हाउसिंग सोसायटी , मोहिदे त. ह. ता. शहादा, जि. नंदुरबार) हे एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी स्वतःच्या, पत्नीच्या व मुलीच्या नावे लाखो रुपयांची रक्कम एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेत मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवलेली होती. पाटील हे बँकेचे ‘क्रीम कस्टमर’ असल्याने बँक व्यवस्थापक (कस्टमर रिलेशन मॅनेजर) अमित अनिल पालोदकर (रा. पालोद, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याने त्यांच्याशी सलगी साधून त्यांच्या घरी येणे जाणे वाढवले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. या काळात पालोदकर याने पाटील यांच्या मोबाईलचे पासवर्ड मिळवले. याचाच आधार घेत पुढे त्याने पाटील व त्यांच्या कुटुंबीयांची दिशाभूल करीत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल एकूण ३८ लाख २० हजार २४८ रक्कम काढून घेतली. नंतर ही रक्कम पालोदकर यांनी त्याचा शालक अनिकेत सुनील महाजन (जळगाव) व त्याचा मित्र आदर्श विलास भालेराव यांच्या खात्यात परस्पर वळवली. विशेष म्हणजे या काळात बँकेकडून पाटील व त्यांच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर जाणारे मेसेज देखील पालोदकर व त्याच्या दोन सहकाऱ्यांनी पुसून टाकण्याची काळजी घेतली होती.
पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर पालोदकर व त्याच्या सहकाऱ्यांनी संगणमताने नियोजित कट रचून याच बँकेचे आणखी एक खातेदार सखाराम दुल्लभ पाटील (रा. श्याम विहार, जुना मोहिदा रोड, शहादा) यांच्याही बँक खात्यातून देखील ११ लाख ३० हजार रुपयांची रक्कम अशाच पद्धतीने परस्पर उडवल्याचे समोर आले. आता या प्रकरणी प्रल्हाद पाटील यांच्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीनपैकी एक आरोपी अनिकेत सुनील महाजन याला बेड्या ठोकल्या आहेत. बँक व्यवस्थापक अमित पालोदकर व अनिकेतचा मित्र आदर्श भालेराव हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सध्या सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



