शहाद्यातील चावरा इंग्लिश स्कूलची मान्यता धोक्यात?; चौकशीत आढळल्या अनेक गंभीर त्रुटी, अहवाल जि.प. शिक्षण विभागाच्या टेबलवर, अंतिम निर्णयाकडे लक्ष

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शहादा शहरातील नामांकित चावरा इंग्लिश स्कूलची मान्यताच धोक्यात असल्याचे वृत्त आहे. या शाळेविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या चौकशीत शाळा व्यवस्थापनाने केलेले अनेक गैरप्रकार समोर आले असून, तसा अहवालच या समितीने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांकडे सादर केल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे ‘आयसीएसई’ बोर्डाची मान्यता न घेताच हा अभ्यासक्रम चालविल्याचे खुद्द शाळा व्यवस्थापनानेच चौकशी समितीसमोर मान्य केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’चे शहादा तालुकाध्यक्ष अनिल भामरे यांनी चावरा इंग्लिश स्कूल व्यवस्थापनाकडून केल्या जाणाऱ्या अनियमिततांच्या विरोधात प्रशासन दरबारी तक्रारी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तातडीने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून शहादा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली. यावेळी या समितीने पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा केली होती. यानंतर सदरील समितीने ठरवून दिलेल्या तारखेनुसार आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. पालकांच्या तक्रारीत आढळले सत्य
चौकशी समिती समोर पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात अनेक तक्रारी मांडल्या होत्या. शाळेकडून शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असून शाळा प्रत्येक विद्यार्थ्याकडून ‘स्पोर्ट्स फी’च्या नावाखाली दरवर्षी तीन ते चार हजार रुपयांची फी वसुली करून या बदल्यात कोणत्याही सुविधा विद्यार्थ्यांना पुरवत नाही, शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि भौतिक सुविधा याबाबत शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही. शालेय पुस्तके शाळेतूनच घेण्याचे बंधनकारक करताना शाळा व्यवस्थापन पुस्तकांच्या किमती अव्वाच्या सव्वा वसूल करते, पालक सभेत पालकांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांना बगल देत शैक्षणिक फीमध्ये मनमानी पद्धतीने वाढ केली जाते, शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, शाळेत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी नाही, अशा एक ना अनेक तक्रारी पालकांनी चौकशी समितीकडे केल्या होत्या. यातील बहुतांश तक्रारीमध्ये सत्य असल्याचे चौकशी समितीला आढळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अप्रशिक्षित शिक्षकांकडूनच शिक्षणकार्य
तसेच सदरील शाळा पालकांकडून त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी भरमसाठ शुल्क आकारत असली तरी शाळेत विविध अभ्यासक्रम शिकविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकच उपलब्ध नसल्याच्या धक्कादायक तक्रारीही काही पालकांनी चौकशी समितीसमोर मांडल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे असे शंभरावर अप्रशिक्षित शिक्षक शाळेत शिकवित असल्याचे यावेळी समोर आले होते. चौकशी समितीच्या अहवालात हा मुद्दाही नमूद असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
‘आयसीएसई’ विनापरवानाच…
अनिल भामरे यांनी केलेल्या तक्रारीत शाळेत आयसीएसई पॅटर्न राबविला जात असल्याबद्दल उल्लेख नव्हता. मात्र प्रत्यक्षात चौकशी समितीने शाळेत जाऊन चौकशी केल्यावर चावरा इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या सात वर्षांपासून कोणत्याही परवान्याशिवाय हा पॅटर्न राबविला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षात या पॅटर्नला प्रवेश घेणाऱ्या तब्बल १८०० विद्यार्थ्यांकडून शाळेने हजारो रुपयांची अतिरिक्त फी उकळली असल्याची माहितीही समोर आली. महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे आयसीएसई पॅटर्न सुरू ठेवण्यासाठी परवाना असल्याचा एकही कागद शाळा व्यवस्थापन चौकशी समितीला सादर करू शकलेले नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
शाळा व्यवस्थापनाकडून सारवासारव
दरम्यान चौकशी समिती समोर पितळ उघडे पडल्यानंतर चावरा इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापनाकडून सर्वसाधारण सुरू करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनाने पालकांना उद्देशून एक पत्र काढले असून त्यात आजवर झालेल्या चुका आणि आढळलेल्या अनियमितता यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असून पालकांनी यासंदर्भात निर्दास्त राहावे, असे आवाहन या पत्रकाद्वारे शाळा व्यवस्थापनाने केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, डॉ. सावळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अंतिम अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला असून आता त्यावर जि. प.चा शिक्षण विभाग कोणता निर्णय घेईल, याकडे शहादा वासियांसह या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे डोळे लागले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार चावरा इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन सविस्तर चौकशी केली. त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला असून, त्याविषयी तूर्तास मला अधिक बोलता येणार नाही.
– डॉ. योगेश सावळे (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, शहादा)



