नंदुरबार जिल्हा

शहाद्यातील चावरा शाळेचा पाय खोलात; चौकशी समितीपुढे पालकांनी वाचला तक्रारींचा पाढा, अहवालासह शिक्षण विभागाच्‍या निर्णयाकडे पालकांचे डोळे, १० हजारावर विद्यार्थ्यांचे भवितव्‍य टांगणीला

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील नामांकित चावरा इंग्लिश स्कूलविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्यानंतर शाळा व्‍यवस्‍थापनाची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी समितीने सोमवारी (दि. २०) शाळेला भेट देत पालक शिक्षक आणि व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत अनेक पालकांनी शाळा प्रशासनाविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता ही चौकशी समिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आज मंगळवारी (दि. २१) अहवाल सादर करणार असून याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शहादा तालुकाध्यक्ष अनिल भामरे यांनी चावरा इंग्लिश स्कूल व्यवस्थापनाकडून केल्या जाणाऱ्या अनियमित्तांच्या विरोधात प्रशासनाची दारे ठोठावत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने तातडीने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार काल सोमवारी शहादा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश साळवे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. यावेळी या समितीने पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली.
पालकांनी केल्या तक्रारी
यावेळी चौकशी समिती समोर पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात अनेक तक्रारी मांडल्या. शाळेकडून शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असून, शाळा प्रत्येक विद्यार्थ्याकडून ‘स्पोर्ट्स फी’च्या नावाखाली दरवर्षी तीन ते चार हजार रुपयांची वसुली केली जाते. असे असूनही या पैशांच्या मोबदल्यात शाळा कोणत्याही दर्जेदार सुविधा विद्यार्थ्यांना पुरवत नाही. शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि भौतिक सुविधांबाबत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालनही केले जात नाही. अशा एक ना अनेक तक्रारी यावेळी पालकांकडून करण्यात आल्या.
विनापरवाना ‘आयसीएसई’ पॅटर्न राबवून लाटले लाखो रुपये!
शहरातील चावरा इंग्लिश स्कूलच्या मनमानी कारभाराचा आणि पालकांच्या आर्थिक लुटीचा प्रकार आता चव्हाट्यावर आला आहे. गेल्या ७ वर्षांपासून या शाळेकडे ‘आयसीएसई’ अभ्यासक्रम शिकवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना, पालकांकडून मात्र हजारो रुपये अतिरिक्त फी उकळली जात असल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाच्या चौकशीत समोर आली असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली. ​ही बाब देखील पालकांनी चौकशी समितीच्‍या निदर्शनास आणून दिली, असे सूत्रांनी सोगितले.
​पालकांनी मागितले फीचे पैसे परत
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शाळा व्यवस्थापनाने पालकांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या पालकांनी आतापर्यंत शाळेतून चढ्या दराने पुस्तके खरेदी केली आहेत, त्यांना किमान २० टक्के रक्कम (डिस्काउंट) परत करण्यात यावी, अशी आग्रही मागणी  सर्व पालकांच्या वतीने करण्‍यात आली. या गंभीर प्रकरणामुळे शहादा तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, आता शिक्षण विभाग यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्‍वाचे म्‍हणजे शिक्षण विभागाच्‍या निर्णयावर या संस्‍थेत शिकणार्‍या १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्‍य अवलंबून राहणार आहे.

शिक्षण विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार चौकशी सुरू आहे. शिक्षक- पालक संघाचे प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन आणि पालक यांची संयुक्त बैठक घेतली. मंगळवारी चौकशी अहवाल जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल.
– डॉ. योगेश साळवे (गटशिक्षण अधिकारी, पं.स. शहादा)

शिक्षण विभागाच्या चौकशीत शाळेचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळेने हा पालकांच्या खिशावर टाकलेला दरोडा असून, या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून शाळा व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
– अनिल भामरे (तालुकाध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button