नंदनगरीत भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात; बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे प्रतिमा पूजन, महाआरती अन् शोभायात्रा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्मोत्सव बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वात प्रथम नंदुरबार शहरातील भगवान परशुराम चौकात प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी जानकी पाठशाळेचे आचार्य मधुकर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागी पुरोहितांनी पुरुषसूक्तचे पठण केल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजनाचा सोहळा पार पडला. यानंतर ब्राह्मण समाजातील वरिष्ठ नागरिक, समाजाच्या विविध संघटनांचे अध्यक्ष यांच्या हस्ते भगवान श्री परशुरामांची महाआरती करण्यात आली.
या जन्मोत्सव सोहळ्यात नंदुरबार बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, समस्त ब्राह्मण पंच, समस्त राजस्थानी ब्राह्मण समाज, समस्त श्रीमाळी ब्राह्मण समाज, औदिचा ब्रम्ह समाज, बाजखेडावळ समाज, पुरोहित संघ आदी संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
शोभायात्रेचा उत्साह
सायंकाळी ब्राह्मणवाडी पासून शोभायात्रा काढण्यात आली. तूप बाजार, माणिक चौक, पिंजारी गल्ली, हाट दरवाजा अहिल्याबाई विहीर, गणपती मंदिर या मार्गे पुन्हा ब्राह्मणवाडीत पोहोचल्यानंतर या शोभायात्रेचा समारोप झाला. या शोभायात्रेत ब्राह्मण समाजाच्या सर्व बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाल मंडळींनी सहभाग नोंदवला.



