नंदुरबारमधील रेल्वे अंडरपासचे काम पावसाळ्याआधी पूर्ण करा; पाहणीवेळी आ. चंद्रकांत रघुवंशी यांची सूचना; पाणी वळवण्यासाठी २ ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईन

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वे अंडरपासमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या ड्रेनेज कामाची आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी हे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. बोगद्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी २ ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईन कार्यान्वित करण्यात येत आहे.
नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने वाहतूक वारंवार विस्कळीत होत होती. त्यामुळे रेल्वे पट्ट्यालगतच्या परिसरातील रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी शिवसेना नेते आ. चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्यानंतर रेल्वे विभागाने १५ मेपासून बोगद्यालगत ड्रेनेज लाईन उभारणीचे काम हाती घेतले आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना आ. रघुवंशी यांनी कामाचा आढावा घेतला व गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगर पालिकेचे नगर अभियंता गणेश गावित, रेल्वेचे सहाय्यक मंडळ अभियंता राधेश्याम मीना तसेच रेल्वे अभियंता सुनील यादव उपस्थित होते.
दोन ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईन
बोगद्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी २ ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईनची उभारणी करण्यात येत आहे. एकता नगरकडून एक ड्रेनेज लाईन तयार करण्यात आली असून, दुसरी लाईन बोगद्यापासून बापू नगर मार्गे पाताळगंगा नदीलगतपर्यंत नेण्यात येणार आहे. सुमारे १ हजार १५० मीटर लांबीच्या या ड्रेनेज प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली. या कामामुळे पावसाळ्यात रेल्वे अंडरपासमध्ये पाणी साचण्याची समस्या कमी होऊन परिसरातील रहिवाशांची वाहतूक व्यवस्था सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



