‘बीपीसीएल’चा हरित उपक्रम : नंदुरबारमध्ये १०० केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण करून विश्व पर्यावरण दिन साजरा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या ५०.४० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प, नंदुरबार यांच्या वतीने डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषि विज्ञान केंद्र, कोलदा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत १०० केशर आंबा रोपांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. होले, सुमीत कुमार, सतीश सिदार यांच्यासह कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी तसेच बीपीसीएलचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला.
यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी बीपीसीएलच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करताना पर्यावरण संवर्धनासाठी शासन संस्था, उद्योग क्षेत्र आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. तर डॉ. होले यांनी अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाबाबत जनजागृती वाढून नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाची भावना अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी बीपीसीएलच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी अशा कार्यक्रमांना पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
“आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या हरित, समृद्ध आणि शाश्वत भविष्याचे बीज आहे, या संदेशासह साजरा करण्यात आलेला हा उपक्रम बीपीसीएलच्या पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत विकासाप्रती असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक ठरला.



