राजकारण

आधी झालं, ते सोडून ताकद असलेल्‍या ठिकाणी लक्ष केंद्रीत करा; शिवसंवाद दौऱ्यात खा. ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांचा तळोदा, नंदुरबारमधील बैठकीत कार्यकर्त्यांना कानमंत्र

तळोदा / नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : भुतकाळात जे घडले, ते सोडून द्या. भविष्‍याकडे पहा. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपली ताकद असलेल्‍या ठिकाणी लक्ष केंद्रीत करा, सूक्ष्म नियोजन करा, बूथ समन्वयक नियुक्त करा, विजय आपलाच असेल, असा कानमंत्र शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला. नंदुरबार व तळोदा येथे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांच्‍या आढावा बैठकीत खा. डॉ. शिंदे बोलत होते.
खा. डॉ. शिंदे यांचा दोन दिवसांचा शिवसंवाद दौरा शुक्रवारी नंदुरबारपासून सुरु झाला. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आ. आमशा पाडवी, आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. राजेंद्र गावित, शिवसेना राज्य संघटक प्रमुख माजी खा. आनंद परांजपे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, पक्षाचे नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख माजी आ. शिरीष चौधरी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
खा. डॉ. शिंदे यांनी सकाळी तळोदा येथे शहादा व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीत त्‍यांनी मतदार यादी पुनरिक्षण मोहीम, बीएलए नियुक्ती आणि २० मतदार बूथमागे एका समन्वयकाची नियुक्ती करावी, असे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले. समन्वयक नियुक्‍तीमुळे प्रत्येक बूथवरचा आढावा घेता येईल. बूथनिहाय काम केल्‍यास संघटना मजबूत होईल व निवडणुकीत विजयाची शक्यता वाढेल, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले.
नंदुरबारमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात जनहिताच्या अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या. त्यामुळेच नगर परिषदा, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाल्याचे खा. शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंवरील वाढलेल्‍या विश्‍वासाचा फायदा घ्‍या…
नंदुरबारमध्‍ये झालेल्या दुसऱ्या बैठकीत नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदारसंघांचा खा. डॉ. शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, शिंदे साहेबांनी शासन आपल्या दारी उपक्रमातून लोकांची कामे केली. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढला आहे. इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक आहेत. कार्यकर्त्यांनी काम करून पक्षाची ताकद वाढवावी. प्रत्येक ठिकाणी धनुष्यबाण गेला पाहिजे. कार्यकत्यांना ताकद देण्यासाठी नेते कटिबद्ध आहेत, अशी ग्वाही खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.
तळोदा, शहाद्यात प्रयत्‍न आवश्‍यक : आ. रघुवंशी
शिवसेनेची अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात ताकद आहे. तळोदा व शहादा तालुक्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी व्यक्त केले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला. पदाधिकारी, नगरसेवकांना पक्षाने ताकद द्यावी, असेही ते म्‍हणाले. आ. आमशा पाडवी, शिरीष चौधरी यांनीही यावेळी मते मांडली.
शिंदे साहेबांचे प्रत्येक तालुक्यावर लक्ष
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्येक तालुक्यावर आणि विधानसभा मतदार संघावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे ४५ अंश तापमान असतानाही नेते दौरे करत आहेत, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले. कोणत्याही निवडणुका नसल्‍या तरी शिवसेना नेते गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना भेटत आहेत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत मोठा बदल झाला आहे. आधी नेते दौऱ्यावर यायचे आणि भाषण करुन जायचे. आता भाषणं नाही तर नेते प्रत्यक्ष फिल्डवर काम करतात आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतात, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी ‘उबाठा’ला लगावला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button