शिवसेनेच्या ताकदीला मामामोहीदाकरांचे बळ; ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील मामामोहीदा येथील ग्रामपंचायत सदस्यांसह विविध पक्षांतील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. आमश्या पाडवी तसेच माजी आ. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरली.
नंदुरबार येथील आमदार कार्यालयात आयोजित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेचा गमछा परिधान करून स्वागत करण्यात आले. यामध्ये मामामोहीदा येथील ग्रामपंचायत सदस्य सतीलाल महिरे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील, राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राकेश पाटील, काँग्रेस पक्षाचे सक्रिय पदाधिकारी रतिलाल कोळी यांच्यासह गणेश पाटील, राकेश पाटील, यशवंत कलाल, सुरेश राजपूत, भूपेंद्र धनगर, आनंदा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भास्कर कोळी आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना आ. रघुवंशी यांनी शिवसेना हा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेसाठी समर्पित भावनेने काम करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. तसेच मामामोहीदा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या विशेष प्रयत्नांतून यशस्वी झाला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. आबा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम वळवी, तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, उत्तम पाटील, धनराज जायसवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



