‘त्या’ सहापैकी कोणते खासदार कोणत्या गटात, आज होणार स्पष्ट; ठाकरेंच्या सेनेच्या संसदीय दलाची होणार बैठक; विलिनीकरणाचा मुहुर्त मात्र चुकण्याचे संकेत

मुंबई / नवी दिल्ली (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासोबत कथितरित्या गेलेले ६ पैकी २ खासदार आपल्याच गटात असल्याचा दावा केलेला असतानाच हेच चित्र सत्य असल्याचे दाखविण्यासाठी आज (दि. १८) संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. ठाकरे गटाने केलेला दावा खरा की शिंदे सेनेचा दावा खरा, हे या बैठकीतून स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, ठाकरे सेनेचे फुटलेल्या खासदारांचा गट शिंदे सेनेत विलीन होण्यासाठी निश्चित करण्यात आलेला उद्याचा (दि. १९) मुहुर्त चुकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे सेनेने या राजकीय घडामोडीत सर्व सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत नसल्याचा दावा केला आहे. आपलाच दावा सत्य असल्याचे चित्र दाखविण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खा. अरविंद सावंत यांनी व्हीप जारी करून आपल्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. आम्हाला आमच्या खासदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत खा. सावंत यांनी ‘त्या’ सर्व खासदारांचे चेहरे समोर आणून ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचे दाखवून द्या, असे आव्हानही शिंदे गटाला दिले आहे.
प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना
शिंदे गटात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या सहापैकी दोन खासदारांची आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा तसेच लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ते दोन खासदार आजच्या बैठकीला निश्चित येतील, असा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे. ठाकरे सेनेच्या या दाव्यात किती तथ्य आहे, हे आजच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, शिंदेंच्या शिवसेनेकडून उंबरठ्यावरच्या सहा खासदारांच्या स्वाक्षरी अधिकृत ठरल्या किंवा सहा खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र ओम बिर्ला यांना सादर करतानाची अधिकृत माहिती किंवा फोटो समोर आलेला नाही. त्यामुळे आपल्या खासदारांविरोधात तूर्तास कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या नेत्यांना देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुहुर्त टळणार?
दुसरीकडे, ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांचा गट उद्या, शुक्रवारी (दि. १९) शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिंदे गटात विलीन होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची अडचण निर्माण झाल्याने या खासदारांच्या विलिनीकरणाचा मुहुर्त काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. आता हा मुहुर्त २१ जूननंतर जाहीर केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
अनिल देसाई (मुंबई), अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), संजय दिना पाटील (मुंबई), राजाभाऊ वाजे (नाशिक), संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी).



