राजकारण

ऐकावे ते नवलच! : ठाकरे गटाचे खासदार फुटल्‍याची घोषणा करणारे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्‍या वक्‍तव्‍याने राजकीय वर्तूळ अचंबित; म्‍हणाले, माझ्‍या रक्‍तात आजही काँग्रेस भिनलेली!

नंदुरबार (खास बातमीदार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील शिवसेनेचा ६ खासदारांचा गट फुटल्‍याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच आता या खासदारांची पावले शिवसेनेच्‍या एकनाथ शिंदे गटाकडे पडत असल्‍याचे स्‍पष्‍ट संकेत मिळत आहेत. अशातच या खासदारांच्‍या फुटीची पत्रकार परिषद घेऊन जाहीर वाच्‍यता करणारे शिंदे गटाचे विधान परिषद सदस्‍य आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी राजकीय धुरिणांना आश्‍चर्यचकीत करणारे वक्‍तव्‍य करून खळबळ उडवून दिली आहे. माझ्या शरीरात आजही काँग्रेसचे रक्त आहे, कारण माझा जन्मच काँग्रेसमध्ये झाला आहे. माझ्या रक्तात आजही थोडीफार काँग्रेस आहे, असे आ. रघुवंशी यांनी म्‍हटल्‍याने सध्‍याच्‍या राजकीय परिस्‍थितीत सार्‍यांच्‍याच भुवया उंचावल्‍या आहेत.
खासदारांच्‍या बंडाच्‍या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्‍या उद्धव ठाकरे गटाने गुरुवारी (दि. १८) संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीपर्यंत या पक्षाचे खासदार खरेच फुटलेत की नाही, हे निश्‍चित मानले जात नव्‍हते. मात्र, याच दरम्‍यान शिवसेनेच्‍या एकनाथ शिंदे गटाचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना ठाकरे गटाचे सहाही खासदार शिवसेनेत (शिंदे गट) सहभागी होत असल्‍याची जाहीर वाच्‍यता केली होती.
त्‍यानंतर अवघ्‍या काही तासांतच त्‍याच आ. रघुवंशी यांनी आपल्‍या शरीरात आजही काँग्रेसचे रक्‍त धावत असल्‍याचे वक्‍तव्‍य करून खळबळ उडवून दिली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्‍ह्यातील शिरपूर येथे शिवसेनेच्‍या शिंदे गटाच्‍या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी हे वक्‍तव्‍य करीत कार्यकर्त्यांना बुचकळ्‍यात टाकले. मेळाव्‍यात बोलताना आ. रघुवंशी यांनी शिवसेना (शिंदे गट) महायुतीचा भाग असतानाच काँग्रेसमधील आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली. माझ्या शरीरात आजही काँग्रेसचे रक्त आहे, कारण माझा जन्मच काँग्रेसमध्ये झाला आहे. माझ्या रक्तात आजही थोडीफार काँग्रेस आहे, असे आ. रघुवंशी म्‍हणाले.
मोठ्या भावाला मस्‍ती आल्‍यास लहाना गप्‍प बसणार नाही : भाजपला टोला
यावेळी आ. रघुवंशी यांनी भाजपलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. देशात भाजपची लाट असतानाही धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता, अशी आठवण करून देत त्यांनी स्थानिक राजकारणातील वास्तव अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. महायुतीतील संबंधांबाबत भाष्य करताना आ. रघुवंशी म्हणाले मोठ्या भावाला म्हणजेच भाजपला जास्त मस्ती आली, तर छोटा भाऊ गप्प बसणार नाही. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोलताना त्यांनी शिवसेना ही अतिक्रमण करणारी पार्टी आहे. असे म्हणत मुंबईतील शिवसेनेच्या शाखांचे उदाहरण दिले. त्यांच्या या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  आ. रघुवंशी यांच्‍या या वक्तव्याकडे आगामी काळा जिल्हा परिषद  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत नाराजीचा सूचक इशारा म्हणून पाहिले जात आहे. आ. रघुवंशी यांच्या या विधानांमुळे महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button