शहादा पोलिसांच्या डीबी पथकाने केला आंतरराज्यीय दारू तस्करांचा पर्दाफाश; हरियाणाहून गुजरातकडे निघालेला कंटेनर प्रकाशात अडवून ९०.२९ लाखांचा दारूसाठा पकडला

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या शहादा पोलीस ठाण्यातील गुप्तहेर शाखेने (डिटेक्टिव्ह ब्रँच – डीबी) धडाकेबाज कारवाई करीत अवैधरित्या दारूची तस्करी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले आहे. शहादा डीबी पथकाने मोठी कारवाई करीत हरियाणाहून गुजरातकडे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडून तब्बल ९० लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करतानाच अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशी दारूचे खोके भरलेला कंटेनर शहादा-प्रकाशा मार्गे गुजरातच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहादा पोलिसांच्या डीबी पथकाने प्रकाशा परिसरात सापळा रचून संबंधित कंटेनर अडवला. तपासणी केली असता कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी ९० लाख २९ हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा व इतर मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकात एपीआय संदीप वाघ, एएसआय चंद्रकांत देसले, पोलीस हवालदार दीपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावळे आणि कपिल मंदिर यांचा समावेश होता. या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातकडे होणाऱ्या अवैध विदेशी दारू तस्करीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



