पक्ष फुटताहेत , पण ढग कधी फुटणार?; पहिल्या दोन आठवड्यांत नंदुरबार जिल्ह्यात तब्बल ८९.३० टक्के कमी पाऊस, आतापर्यंत १० टक्केही बरसला नाही!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : निसर्ग नियमानुसार पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले असले तरी मान्सून सक्रीय न झाल्याने खान्देशात अद्यापही पुरेसा पाऊस बरसलेला नाही. अशताच एक गंभीर आकडेवारी समोर आली असून, त्यानुसार खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात मिळून पावसाळ्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत मिळून सरासरीच्या तब्बल १० टक्के देखील पाऊस झालेला नाही. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची ही तूट तब्बल ८९.३० टक्के असल्याचे ही आकडेवारी सांगते.
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवासावर परिणाम झाला आहे. मान्सूनने कोकणात वेळेवर प्रवेश केला असला तरी ‘एल निनो’ इफेक्टमुळे तो तिथेच अडकून पडला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. खान्देशचा विचार करता गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पहिल्या पंधरवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. यंदा मात्र ही आकडेवारी सरासरीच्या तुलनेत १० टक्क्यांपेक्षाही कमी आली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही पुरेसा पाऊस पडत नसल्याने ही तूट दिवसागणिक वाढतच चालली आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पहिल्या १५ दिवसांत नंदुरबार जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक म्हणजेच तब्बल १०१ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा हा आकडा तब्बल ८९.३० टक्क्यांनी कमी म्हणजे अवघ्या १० मिलमीटरवर आला आहे. खान्देशातील जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यांतही यंदा पावसाची तूट अनुक्रमे ८७.०६ आणि ९७.८१ टक्के इतकी खाली आली आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९.६ मि.मी. तर धुळे जिल्ह्यात केवळ १.६ मि.मी. पाऊस झाला आहे.
या संदर्भात भाष्य करताना हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हणाले की, मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल झाला असला तरी बाष्पयुक्त ढगांची निर्मिती पुरेशी होवू न शकल्याने साहजिकच पाऊस पुरेसा पडू शकलेला नाही. मात्र, नजीकच्या भविष्यात म्हणजेच पुढील आठवडाभरात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे.



