महाराष्ट्र

एल निनो इफेक्‍ट : अवैध पाणीउपसा थांबवा, पाण्याची आवर्तने तत्काळ बंद करा, दर आठवड्याला अहवाल द्या; ‘जलसंपदा’चे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्‍तांना निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : यंदा एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहून पर्जन्‍यमानात घट होण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारने राज्‍यभर उपलब्‍ध पाणीसाठ्याचा जपून वापर करण्‍याच्‍या उपाययोजना सुरू केल्‍या आहेत. याच धोरणांतर्गत राज्‍यातील विविध धरणे, जलाशय व जलस्‍त्रोतांमध्‍ये उपलब्‍ध पाणीसाठा संरक्षित करुन, अवैध पाणीउपसा बंद करण्‍यासह या पाण्‍याची आवर्तने तत्‍काळ बंद करण्‍याचे निर्देश जलसंपदा विभागाने सर्व विभागीय आयुक्‍त आणि जिल्‍हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी या संदर्भातील पत्र सर्व जिल्‍हाधिकारी व विभागीय आयुक्‍तांना पाठवले आहेत. आपापल्‍या कार्यक्षेत्रातील धरणे व जलाशयांमधील उपलब्‍ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्‍यावा, अत्‍यावश्‍यक परिस्थिती वगळता पिण्‍यासाठी राखीव पाण्‍याचा वापर इतर कोणत्‍याही कारणांसाठी होणार नाही, याची काळजी घ्‍यावी, ३१ ऑगस्‍टपर्यंत सर्व शहरी व ग्रामीण भागात अखंडित पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा होईल यासाठी धरणांत आरक्षित पाणीसाठा जपून वापरण्‍याबाबतही जिल्‍हास्‍तरावर कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना डवले यांनी या पत्रात केल्‍या आहेत.
अवैध पाणी उपसा तत्‍काळ थांबवा
स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, पाणी पुरवठा विभाग यांच्‍यात योग्‍य समन्‍वय ठेवून परिस्थितीचा नियमित आढावा घ्‍यावा आणि धरणे, कालवे, नद्या, तलाव व इतर जलस्‍त्रोतांमधून होणारा बेकायदा जलउपसा तातडीने थांबविण्‍यासाठी विशेष मोहीम राबवावी, यासाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाच्‍या आधिकार्‍यांच्‍या संयुक्‍त पथकांमार्फत अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप व इतर सामुग्रींच्‍या तपासणीसाठी गस्‍त आयोजित करावी व वेळप्रसंगी १२ डिसेंबर २०१८ रोजी काढलेल्‍या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश या परिपत्रकातून देण्‍यात आले आहेत. या संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्‍यास सांगण्‍यात आले आहे.
एल निनो म्हणजे…
एल निनो म्हणजे विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढणे. एल निनो हा उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील नैसर्गिक हवामान प्रक्रियेचा भाग असून, त्याचा हवामानावर मोठा परिणाम होतो. एल निनोमुळे अनेक देशांत कमी पावसाची तर काही भागांत अतिवृष्टी शक्यता असते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button