महाराष्ट्र

नंदुरबारवर पाऊस रूसला; सरासरीच्‍या अवघ्‍या २९ टक्‍के बरसला, राज्‍यात निचांकी नोंद, पेरण्‍या खोळंबल्‍या, बळीराजा चिंतेत

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : मुंबई-ठाण्‍यावर भरभरून बरसणारा पाऊस राज्‍याच्‍या इतर जिल्‍ह्यांवर मात्र रूसला आहे. विशेषत: नंदुरबार जिल्‍ह्यावर वरूणराजाने यंदा वक्रदृष्‍टी केली असून, यावर्षी आतापर्यंत नंदुरबार जिल्‍ह्यात सरासरीच्‍या अवघे २९ टक्‍के पाऊस बरसला आहे. ही राज्‍यातील सर्वांत निचांकी नोंद असून, पावसाने ओढ दिल्‍याने नंदुरबार जिल्‍ह्यातील पेरण्‍या अजूनही खोळंबलेल्‍या असून, शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
दुसरीकडे, राज्‍यात १ ते १३ जुलैच्‍या दरम्‍यान ३३४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, ती सरासरी ३४६.४ मि.मी.च्‍या तुलनेत ९६.२८ टक्‍के आहे. एकंदरीत राज्‍यात पावसाचे वितरण अद्यापही असमान असल्‍याची माहिती मंगळवारी राज्‍य मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत देण्‍यात आली.
धरणांत ४४ टक्‍के पाणीसाठा
राज्‍यातील धरणांमध्‍ये सध्‍या एकूण साठवण क्षमतेच्‍या ४४ टक्‍के पाणीसाठी शिल्‍लक असल्‍याचे सांगताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षीच्‍या (२०२७) ऑगस्‍टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करण्‍याचे आदेश या बैठकीत दिले.
‘दुबार’ संकटात मोफत बियाणे
नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा बोगस बियाणांमुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्‍यास शेतकर्‍यांना स्‍वखर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाही. बाधित शेतकर्‍यांना जिल्‍हा नियोजन समितीच्‍या (डीपीडीसी) माध्‍यमातून मोफत बियाणे उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्‍याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

कुठे, किती पाऊस ?  
१०० % : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्‍नागिरी, अहिल्‍यानगर, पुणे, सातारा, सांगली, जालना
७५ ते १०० % : १२ जिल्‍ह्यांत
५० ते ७५ % : १२ जिल्‍ह्यांत

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button