नंदुरबार जिल्हा

विनाहेल्‍मेट दुचाकीस्‍वार नंदुरबारकरांनो सावधान; वाहतूक शाखेची ‘ॲक्‍शन’ सुरू, आतापर्यंत २६ हजार जणांना पाठवले २.६३ कोटींचे इ-चालान!

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : जीवावर उदार होवून वाहतुकीचे नियम उधळून लावतानाच विनाहेल्‍मेट दुचाकी चालवणार्‍यांवर पोलिसांच्‍या वाहतूक शाखेने ‘ॲक्‍शन’ सुरू केली आहे. विशेषत: हेल्‍मेट परिधान केल्‍याशिवाय दुचाकी चालवणार्‍यांच्‍या विरोधात वाहतूक शाखेने कडक भूमिका घेतली असून, त्‍यांच्‍यावर दंडाची कारवाई केली जात आहे. यामुळे आता विनाहेल्‍मेट दुचाकी वाहन चालविणे नंदुरबारकरांना महागात पडत आहे.
जिल्‍हा पोलिसांच्‍या वाहतूक शाखेने दिलेल्‍या माहितीनुसार, २०२६ च्‍या पहिल्‍या सहा महिन्‍यांत वाहतूक शाखेने तब्‍बल २६ हजार ५६७ दुचाकी वाहनधारकांवर कारवाई केली. यापैकी २५७ वाहनधारकांकडून २५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला. तर उर्वरित २६ हजार ३१० वाहन चालकांना २ कोटी ६३ लाख १० हजार रुपयांचे इ-चालान आकारण्‍यात आले.
दरम्‍यान, सातत्‍याने वाहतुकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन तसेच गंभीर स्‍वरूपाचे नियमभंग करणार्‍या ३८ वाहनचालकांचे वाहन वाहन परवाने निलंबित करण्‍याची प्रक्रियाही सुरू करण्‍यात आली आहे. या संदर्भातील प्रस्‍ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्‍यात आले आहेत.
दुसरीकडे, मद्यप्राशन करून वाहन चालवून स्‍वत:सह इतरांच्‍या जीवाशी खेळ करणार्‍या ३६ वाहनधारकांवर वाहतूक शाखेने मोटार वाहन कायद्याच्‍या कलम १८५/१७७ अन्‍वये कारवाई केली आहे. या सर्व प्रकरणांचा गुन्‍हा थेट न्‍यायालयात दाखल करण्‍यात आला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button