रोखठोक

‘आपला तो बाबा अन्‌ दुसर्‍याचं ते कार्ट’ : नंदुरबार ’आरटीओ’ पथकाकडून नियम पायदळी; स्‍वत:च्‍या वाहनाची कागदपत्रे मुदतबाह्य तरी इतर वाहनधारकांवर करताहेत कारवाई!

शहादा (प्रा. डी.सी. पाटील / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नियम शिकवणाऱ्यांनीच नियम पायदळी तुडवल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार बसस्थानक परिसरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या वाहनाची कागदपत्रे मुदतबाह्य असताना नागरिकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्‍या पथकाच्या कार्यपद्धतीवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शनिवारी, (दि. १२) सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार बसस्थानक परिसरात आरटीओ पथकाने वाहन तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत अनेक वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला. मात्र, या कारवाईची पद्धत आणि हेतूवरच स्‍थानिकांनी आक्षेप घेतला आहे.
नातेवाईकाला सोडणे गुन्‍हा ?
प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेली वाहने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत नव्हती, तर या गाड्या घेऊन काही जण केवळ आपल्या नातेवाईकांना बसस्थानकात सोडण्यासाठी आलेले होते. अशा वाहनांवरही चलन आकारले गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. “आता नातेवाईकांना बसस्थानकात सोडायचे तरी कसे?, नातेवाईकांना गाडीवरून सोडणे, हा गुन्‍हा आहे का?, याचे उत्तर आरटीओने द्यावे,” असा संतप्त सवाल एका प्रवाशाने उपस्‍थित केला.
सर्वात मोठा गौप्यस्फोट : आरटीओचेच वाहन अनफिट!
या कारवाईत सर्वात गंभीर बाब समोर आली आहे ती म्हणजे, कारवाईसाठी वापरलेल्या शासकीय वाहनाचीच कागदपत्रे पूर्ण नसल्याचा आरोप. मिळालेल्या वाहन तपशीलानुसार, आरटीओ पथकाने वापरलेल्या एमएच १८ व्‍ही ३१७३ या क्रमांकाच्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) ११ जून २०२६ रोजीच संपले होते. म्हणजेच 12 जुलै रोजी केलेल्या कारवाईच्या वेळी तब्बल एक महिन्यापासून हे वाहन पीयूसीशिवाय रस्त्यावर धावत होते.
मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी नसलेले वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. मग हाच नियम आरटीओच्या वाहनाला लागू होत नाही का? स्वतःची गाडी नियमबाह्य ठेवून सामान्य जनतेकडून नियम पाळण्याची अपेक्षा करणे, हा दुटप्पीपणा असल्याची टीका होत आहे.
नियम सर्वांसाठी समान हवेत. आरटीओने आधी स्वतःच्या वाहनांचे कागदपत्र तपासावेत आणि मगच नागरिकांवर कारवाई करावी.
या प्रकरणामुळे आरटीओ विभागाच्या प्रतिमेला तडा गेला असून, या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पथकावर कारवाई करण्याची मागणी प्रवासी महासंघ व स्थानिक नागरिकांनी विभागीय परिवहन अधिकारी, परिवहन आयुक्त आणि नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button