शहादा तालुक्यात बिबट्याचा राडा; अवघे-जुणवणे, होळमोहिदात जोरदार हल्ला करीत चौघांना केले जखमी, नंतर घरातच ठोकला मुक्काम

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादावासीयांच्या जीवावर उठलेल्या बिबट्याने तालुक्यात जोरदार राडा घातला असून, या बिबट्याने तालुक्यातील अवघे-जुनवणे व होळमोहिदा येथे केलेल्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांवरही सध्या शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता या बिबट्याने नंतर होळमोहिदा शिवारातील चक्क एका घरात मुक्काम ठोकला. रात्री उशीरापर्यंत या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाचे प्रयत्न सुरू होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शहादा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. शिकारीसाठी मानवी वस्तीकडे वळलेल्या बिबट्याने बुधवारी (दि. १५) थेट अवघे-जुनवणे शिवारात प्रवेश करीत रतिलाल सोमा चव्हाण, सुरज ब्रिजलाल चव्हाण (दोघेही रा. अवघे-जुनवणे) तसेच वैशाली विशाल भामरे आणि सात वर्षीय बालक रोहन सचिन सामुद्रे (दोघेही रा. होळमोहिदा) या चौघांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले. या चौघांवरही सध्या शहादा येथील ग्रामणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यानंतर बिबट्याने होळमोहिदा येथील घरात घुसून तेथेच ठाण मांडले. बिबट्याच्या हल्ल्यासह त्याच्या मुक्कामाची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल रत्नपारखी व त्यांच्या सहकार्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घरात घुसून थांबलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, बिबट्याच्या वारंवार होणार्या हल्ल्यांमुळे शहादा तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी वाढत आहे.



