ज्ञानोबा माऊली तुकाराम : नंदुरबार जिल्ह्यात आषाढीचा उत्साह, प्रकाशात ‘सर्वोदय’च्या विद्यार्थ्यांच्या बालदिंडीने निर्माण केले भक्तीमय वातावरण

प्रकाशा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गेले दोन महिने गायब असलेला पाऊस परतल्याने यंदा नंदुरबार जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्साह वाढवला असून, जिल्हाभर अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे. जिल्हाभरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसत असून, आषाढीच्या पूर्वसंध्येला जिल्हाभरात अनेक ठिकाणी दिंड्या काढून उत्साही वातावरण निर्मिती करण्यात आली. श्रीक्षेत्र प्रकाशा येथेही आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील सर्वोदय विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात ‘भव्य पालखी सोहळा व बालदिंडी’ काढून आषाढी एकादशीचा उत्साह वाढवला. टाळ-मृदुंगाचा गजर आणि “ज्ञानबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण प्रकाशा नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली.
सकाळी प्रशालेच्या प्रांगणात श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम यांच्या प्रतिमेचे व पादुकांचे भावपूर्ण पूजन करण्यात आले. त्यानंतर बालवारकऱ्यांच्या दिंडीने शहरातून शिस्तबद्ध फेरफटका मारला.
गावकऱ्यांकडून ठिकठिकाणी स्वागत
पारंपरिक पोशाखात सज्ज झालेल्या बालवारकऱ्यांनी सर्वांचेच मन मोहून घेतले. मुलांनी पांढरा कुडता-पायजमा, डोक्यावर तुळशीचे रोप, हातामध्ये टाळ-पताका आणि अंगावर उपरणे धारण केले होते; तर मुलींनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ग्रामस्थांनी या बालवारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली, तर अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी दिंडीचे व पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. बालवारकऱ्यांच्या या नयनरम्य सोहळ्याने संपूर्ण प्रकाशा गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
भक्तीमय वातावरणात फुगड्या आणि अभंग
प्रशालेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत जनाबाई यांच्या अभंगांचे गायन केले. विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी फुगड्यांचा फेर धरत भक्तिभाव व्यक्त केला. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “माऊली”च्या गजराने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
संस्कारांची रुजवणूक आवश्यक
“अशा उपक्रमांमुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृती, परंपरा आणि चांगल्या संस्कारांची रुजवणूक होते,” असे मनोगत याप्रसंगी मुख्याध्यापक व मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



