गुन्हे वार्ता

पोटाला चिमटा देवून लेकीसाठी पैसे साठवले अन्‌ चोरट्याने एका क्षणात लांबवले; तळोद्यात दुचाकीस्‍वारांनी पायी जाणार्‍या महिलेची पर्स हिसकावली, ३० हजारांचा फटका

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहरातील आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालय परिसरातून पायी घरी निघालेल्‍या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्‍या चोरट्याने हिसकावून पळ काढल्‍याची घटना तळोद्यात सोमवारी (दि. २०) सकाळी ११.३० वाजेच्‍या सुमारास घडली. या पर्समध्‍ये सदरील महिलेने लेकीच्‍या शिक्षणासाठी पोटाला चिमटा देवून जमविलेली तब्‍बल ३० हजार रुपयांची रक्‍कम होती.
चंदा अमोल अहिरे असे पर्स पळविण्‍यात आलेल्‍या महिलेचे नाव असून, भरदिवसा घडलेल्‍या या घटनेमुळे तळोदा शहरात खळबळ उडाली आहे. चंदा अहिरे या सोमवारी सकाळच्‍या सत्रात शहरातील स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या शाखेतून पैसे काढून पायी घरी जात असताना हा प्रकार घडला. अहिरे या चालत जात असताना मागून दुचाकीवर आलेल्‍या दोघांनी त्‍यांच्‍या हातातील पर्स हिसकावून धुम ठोकली. अचानक हा प्रकार घडल्‍यानंतर अहिरे यांना काही क्षण काहीच समजले नाही. पैशांची पर्स गेल्‍याचे लक्षात येताच त्‍यांनी आरडाओरड सुरू केली. यानंतर आसपासचे लोक त्‍यांच्‍या मदतीला धावले. परंतु, तोपर्यंत चोरट्यांनी पोबारा केला होता.
लेकीसाठी जमवले होते पैसे
चंदा अहिरे यांनी मुलीच्‍या शिक्षणासाठी पोटाला चिमटा देवून जमवलेले पैसे बँकेत ठेवले होते. मात्र, ही रक्‍कम बँकेतून काढून त्‍या घरी जात असतानाच चोरट्यांनी त्‍यावर डल्‍ला मारला. चंदा अहिरे या बँकेत असतानाच किंवा बाहेरून त्‍यांच्‍यावर नजर ठेवून चोरट्यांनी हे काम केल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. दरम्‍यान, घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर पोलीस उपनिरीक्षक निलेश साळी, गौतम बोराळे यांनी घटनास्‍थळी धाव घेत पाहणी केली. तळोदा शहरात बँकेतून घरी जाणार्‍यांची लूट करण्‍याचे प्रकार या आधीही दोन वेळा घडले आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button