जावदात जिनिंगच्या बंद दाराआड सुरू होता दारू तस्करीचा गोरखधंदा; म्हसावद पोलिसांनी केला पर्दाफाश, सुमारे २ कोटींचा मद्यसाठा, १४ वाहने जप्त

शहादा (सलाउद्दीन लोहार) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद गावाजवळील बंद पडलेल्या कपास जिनिंगमध्ये सुरू असलेल्या विदेशी दारू तस्करीच्या मोठ्या अड्ड्याचा अड्डा म्हसावद पोलिसांनी पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे दोन कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा, एक ट्रक, एक ट्रॉला, आलिशान व्हीआयपी कारसह एकूण १४ वाहने जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, बंद पडलेल्या जिनिंगचा वापर विदेशी मद्याचा मोठा साठा लपविण्यासाठी केला जात होता. येथून कंटेनर आणि ट्रकच्या माध्यमातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची तस्करी करण्याची तयारी सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तस्करीच्या या रॅकेटमध्ये आलिशान व्हीआयपी कारचाही वापर करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी सुमारे १२ वाहनांवर गुजरात राज्याची नोंदणी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणामागे आंतरराज्य पातळीवर कार्यरत असलेल्या तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
म्हसावद पोलिसांनी वेळेवर कारवाई करत तस्करांचा मोठा डाव उधळून लावला असून, प्राथमिक अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करीविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, विदेशी मद्याचा साठा नेमका कुठून आणण्यात आला, तस्करीचे जाळे किती व्यापक आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, अधिकृत पंचनामा, जप्तीचा अंतिम आकडा आणि आरोपींबाबतची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



