नंदुरबार जिल्हा

प्रकाशा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा राज्यस्तरीय गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिलीपभाई पाटील यांचा सन्मान

प्रकाशा (राजू साळी) : प्रकाशा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्‍या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत मोठा सन्मान प्रदान करण्‍यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात सोसायटीचे चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीपभाई ज्ञानदेव पाटील यांना कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र आणि गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. राज्यभरातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था आणि पदाधिकाऱ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्रकाशा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवड होणे ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
प्रकाशा विविध कार्यकारी सेवा सोसायटीने गेल्या काही वर्षांत शेतकरी हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, शेतीसाठी आवश्यक सुविधा, कृषीविषयक मार्गदर्शन तसेच सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
चेअरमन दिलीपभाई पाटील यांनी हा सन्मान सोसायटीच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी, सभासद आणि शेतकरी बांधवांना समर्पित असल्याचे सांगितले. “हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करत राहू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रकाशा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, सर्व कर्मचारी आणि सन्माननीय सभासद यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. या सन्मानामुळे प्रकाशा गावासह संपूर्ण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सहकार चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button