धक्कादायक : आ. विजयकुमार गावितांचे बनावट लेटरहेड छापून बोगस स्वाक्षरी करून ९ कोटींचा निधी वळवला, माजी आ. शिरीष चौधरींसह चौघांवर गुन्हा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या नावाचे बोगस लेटरहेड छापून त्यावर त्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून तब्बल ९ कोटी रुपयांचा निधी दुसर्याच कामांसाठी वळवून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, नंदुरबारचा एक नगरसेवक आणि इतर दोघांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नंदुरबारच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आ. विजयकुमार गावित यांच्या कार्यालयाचे प्रमुख अशोक शिवाजी बेहरे यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. माजी मंत्री असलेल्या आ. डॉ. गावित यांनी त्यांच्या आमदार निधीतून जून व ऑगस्ट २०२४ मध्ये नंदुरबार नगरपालिकेच्या अंतर्गत विविध विकासकामांसाठी ३४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मध्यंतरीच्या काळात गेल्या अनेक दिवसांपासून आ. डॉ. गावित आजारी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत माजी आ. शिरीष चौधरी, नंदुरबार नगरपालिकेचा सदस्य असलेला नगरसेवक गौरव चौधरी, नयन दिलीप चौधरी व किशोर पाटील अशा चौघांनी डॉ. गावित यांचे बोगस लेटरहेड छापून घेतले. यानंतर ऑगस्ट व नोव्हेंबर २०२५ तसेच जानेवारी २०२६ मध्ये या चौघांनी चार बनावट लेटरहेडवर आ. डॉ. गावित यांच्या बनावट स्वाक्षर्या मारून ते मंत्रालयात सादर केले. त्या माध्यमातून जानेवारी, जून आणि ऑगस्ट २०२४ च्या मूळ शासन निर्णयात शुद्धिपत्रकाद्वारे बदल करून एकूण ९ कोटी रुपये नंदुरबार शहरातील वेगळ्याच कामांसाठी वर्ग करून घेतले. विशेष म्हणजे वळवण्यात आलेल्या निधीपैकी दोन कोटी रुपये माजी आ. शिरीष चौधरी यांचे वडील कै. हिरालाल चौधरी स्मृती चौधरी उद्यानाच्या कामांसाठी वर्ग करून घेण्यात आले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून वरील चौघांविरोधात नंदुरबार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


