खळबळजनक : जेवणाचा पहिला घास घेताच मळमळ, उलट्या; शहाद्यातील शासकीय वसतिगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; सहा जणांची प्रकृती चिंताजनक
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात रात्रीच्या जेवणानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. जेवणानंतर अचानक उलट्या सुरू झाल्याने वसतिगृहात खळबळ उडाली. बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने वसतिगृहातील निकृष्ट जेवणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान वसतिगृहातील २१७ अधिक विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केले. स्वयंपाकी शाम बिहारी याने मेनूमध्ये शेवगाची भाजी, भात आणि पोळ्या दिल्या होत्या. मात्र, जेवण सुरू करताच विद्यार्थ्यांना अचानक मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. यानंतर वसतिगृहात धावपळ उडाली. प्रकृती खालावलेल्या ४० ते ५० विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये देविदास बाशिंगे (रा. ओसर्ली), पार्थ धीवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज सिताराम कुवर, पारदिप (पूर्ण नाव माहिती नाही), मनोहर भैया पान पाटील या सहा विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पालकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. आपल्या मुलांची अवस्था पाहून पालकांनी रुग्णालयात आक्रोश केला. दरम्यान, घटनेनंतर मुख्याध्यापक रोहिदास वळवी आणि वॉर्डन कपिल सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असा आरोप पालकांनी केला आहे.
तर या वसतिगृहात नेहमीच निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. विशेष म्हणजे, याबाबत तक्रार केल्यास विद्यार्थ्यांना दमदाटी केली जाते, असा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. या घटनेमुळे वसतिगृह प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक गिरासे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, नगरसेवक मुनेश जगदेव, आमदार यांचे स्वीय सहायक हेमराज पवार आणि रुग्णालयाची वैद्यकीय टीम डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. राकेश पाटील व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली आणि विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले.
रवी सुकलाल बैसाणे, कीर्ती राज सखाराम घोडेसर, मोहित महेंद्र बैसाणे, रोशन सुरेश शिंदे, आदित्य अंबालाल सूर्यवंशी, दिनेश योगेश मोहिते, पंकज सिताराम कुवर, प्रदीप सूर्यवंशी, शंकर सिताराम कुवर, चेतन महिरे, धनेश विनोद सोनवणे, चंद्रकांत रवींद्र सोनवणे, मयूर रणशिंगे, सागर रणशिंगे, धम्मवीर रतिलाल घोडास, रोशन शिंदे या विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तक्रार करूनही व्यवस्थापनाने लक्ष दिले नाही : विद्यार्थ्यांची आपबिती
घटनेची आपबिती सांगताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट होती. आम्ही वारंवार तक्रार करूनही व्यवस्थापनाने जेवणाकडे लक्ष दिले नाही. शनिवारी सायंकाळी जेवण सुरू केल्यावर पहिला घास घेताच अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या. एक विद्यार्थी खाली पडला. इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्यानंतर आम्हाला एका रूममध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर काही जण आरडाओरड ऐकून पळत आले. त्यांनी आम्हाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जेवण न केलेल्या विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास झाला नाही, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, हे सर्व विद्यार्थी अनुसूचित जाती, नव बौद्ध मुलाची शासकीय निवासी शाळा येथे सहावी ते दहावीत शिक्षण घेत असून, ते नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून मोहिदा शिवारातील शासकीय व वसतिगृहात वास्तव्यास आहेत.



