मुख्य बातम्या

ये रे ये रे पावसा! : महाराष्‍ट्र, मध्‍यप्रदेशातील गावांत ‘गाव बंद’ ठेवून पावसासाठी कोचरामातेच्‍या चरणी साकडे!, खेतिया, खेडमध्‍ये शुकशुकाट

शहादा (सलाउद्दीन लोहार) : एकीकडे महाराष्‍ट्रातील काही शहर आणि गावांत पावसाने धुमाकूळ घालून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करतानाच अनेक बळी घेतलेले असतानाच महाराष्‍ट्र आणि मध्‍यप्रदेशातील एकमेकांच्‍या सीमांना लागून असलेल्‍या काही गावांतील रहिवशांना मात्र पावसासाठी गाव बंद ठेवून ईश्‍वराला साकडे घालण्‍याची वेळ आली आहे. मध्‍यप्रदेशातील खेतिया आणि महाराष्‍ट्रातील शहादानजीकच्‍या खेड येथील गावकर्‍यांनी गाव बंद ठेवून कोचरामातेच्‍या मंदिरात पूजा करून देवीला पावसासाठी साकडे घातले.
महाराष्‍ट्रातील नंदुरबार जिल्‍हा आणि मध्‍यप्रदेशातील महाराष्‍ट्राच्‍या सीमेला लागून असलेल्‍या अनेक गावांतील रहिवाशांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मध्‍यप्रदेशच्‍या खेतिया आणि परिसरात गेल्‍या अनेक दिवसांपासून पुरेसा पाऊस न पडल्‍याने पेरण्‍या खोळंबल्‍या असून, शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागल्‍याची परिस्‍थिती आहे. या परिसरात कोरड्या दुष्‍काळाचे सावट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर या परिसरातील गावकर्‍यांनी आपल्‍या प्राचीन श्रद्धा आणि परंपरेनुसार खेतिया शहर बंद ठेवून पावसासाठी ईश्‍वराला साकडे घातले. यासाठी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजनही करण्‍यात आले होते. महाराष्‍ट्र सीमेवरील खेड गावातही पावसासाठी कडकडीत बंद पाळण्‍यात आला. गावातील सर्व गावकर्‍यांनी गावाबाहेर जावून वनभोजन घेतले. यानंतर गावकर्‍यांना कोचरामाता मंदिरात जावून धार्मिक विधी करीत मातेच्‍या चरणी चांगल्‍या पावसासाठी साकडे घातले. मुस्‍लिम समाजानेही गावात मोठी रॅली काढली. यानंतर मुस्‍लिम समाज बांधवांनी पाऊस आणि विश्‍वशांतीसाठी सामूहिक नमाज पठण केले. गाव बंद ठेवून आणि ईश्‍वराला साकडे घातल्‍याने या परिसरात पाऊस पडतो, अशी या परिसरातील गावकर्‍यांची श्रद्धा आहे.
मध्‍यप्रदेशातील खेतिया आणि महाराष्‍ट्रातील या सीमेवरील गावांत परस्‍पर मोठे व्‍यवहार चालतात. या परिसरातील मजूरांचा दोन्‍ही राज्‍यांत राबता असतो. मध्‍यप्रदेशात काम नसल्‍यावर खेतिया परिसरातील मजूर महाराष्‍ट्रातील खेड, ब्राह्मणपुरी, रायखेडा, गोगापूर या भागात कामासाठी येत असतात. सध्‍या सीमेवरील दोन्‍ही राज्‍यांतील गावांत पाऊस पडत नसल्‍याने मजूरांचे हाल सुरू आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button