सावधान : ‘तापी’काठी राहणार्यांना सतर्कतेचा इशारा; ‘हतनूर’चे चार दरवाजे उघडले; प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजमधून ‘तापी’त कोणत्याही क्षणी सोडणार पाणी!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणाच्या धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. परिणामी धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आली असून, ५ हजार ३६८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीचे पाणी वाढले असून, प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज प्रकल्पातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी या दोन्ही प्रकल्पांतून कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर तापी नदी काठावर राहणार्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खान्देशातील धरणांची पाणीपातळी वाढली असून, हतनूरपाठोपाठ शेळगाव बॅरेज प्रकल्पाचेही ३ दरवाजे अर्धा मीटरने उघडून ५ हजार ४२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शिवाय धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळीही वाढत असून, या प्रकल्पातून पुढील काही तासांत तापी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. हतनूर धरण आणि शेळगाव व सुलवाडे बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यास ‘तापी’चे पाणी वाढणार असून, परिणामी प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी या दोन्ही प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लागणार आहेत.
या पार्श्वभूमीवर तापी नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात तापी काठावरील गावांतील रहिवाशांनी नदीपात्रात गुरेढढोरे सोडू नयेत, नदीपात्रात ठेवलेले शेतीसाहित्य, पाण्याचे पंप व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, नदीपात्रात अनावश्यक वावर टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



