मुख्य बातम्या

ब्रेकिंग न्‍यूज : उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्‍येत बिघडली; उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल

मुंबई / ठाणे (खास बातमीदार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांची तब्‍येत अचानक बिघडली असून, त्‍यांना तातडीच्‍या उपचारासाठी ठाण्‍यातील खासगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. शिंदे यांच्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु असून, तूर्त त्‍यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्‍याची माहिती पुढे आली आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या प्राथमिक माहितीनुसार, सध्‍या राज्‍य मंत्रिमंडळाचे अधिवेशन सुरू असून, गेल्या काही दिवसांत कामाचा अतिताण आणि दगदग याचा परिणाम शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला आहे. यामुळे शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु असतानाच शिंदे यांना कणकण जाणवू लागली आणि त्‍यांना ताप भरला. त्यांना प्रचंड अशक्तपणाही जाणवत होता. याच दरम्‍यान शुक्रवारी ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात दुपारी धुळ्यातील ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर शिंदे यांना तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले. सध्या ते रुग्णालयातच असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अर्थात, असे असले तरी तूर्तास शिंदे यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याची गरज नसल्‍याचे शिवसेनेतील सूत्रांनी म्‍हटले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्‍याच्‍या राजकारणासह शिंदे सेनेत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटाचे सहा खासदार आणि मुंबईतील विधान परिषद सदस्‍य आ. सचिन अहिर शिंदे सेनेत दाखल झाले. यानिमित्ताने शिंदे यांना अनेकदा दिल्‍लीला जावे लागले. त्‍यातच विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज व अन्‍य कामे या सार्‍या घडामोडींमुळेही त्‍यांची धावपळ झाली. याचाच परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढलेल्‍या शुभांगी पाटील यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश काल दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे यांच्‍या उपस्‍थितीत होणार होता. मात्र, शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला. अखेर शुक्रवारी मध्‍यरात्रीनंतर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा ठाण्यात पक्षप्रवेश झाला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button