विठूराया पावला : नंदुरबार जिल्ह्यावर पावसाची कृपा, दिवसभर रिपरिप, पिकांना दिलासा, शेतकर्यांच्या चेहर्यावर हसू परतले

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून नंदुरबार जिल्ह्याला हुलकावणी देणारा पाऊस अखेर आषाढी एकादशीचा मुहुर्त साधून जिल्ह्यात परतला आहे. गेल्या ४८ तासांपासून जिल्हाभर सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील तब्बल पावणेदोन लाख हेक्टरवरील शेतातील करपू लागलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. सोबतच चिंतेचे ढग बाजूला सरून शेतकर्यांच्या चेहर्यावरील हसूही पुन्हा परतले आहे.
गेले सुमारे पावणेदोन महिने गायब असलेल्या पावसांच्या सरींनी मंगळवारी सकाळपासूनच नंदुरबार जिल्ह्याला ओलेचिंब करायला सुरूवात झाली. बुधवारी देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. बुधवारी दिवसभरात जिल्हाभर सुमारे २० मि.मी. पावसाची नोंद झाली. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ६५ हजार ८३० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पाऊस गायब असल्याने ही पेरणी वाया जाण्याच्या भीतीने शेतकर्यांच्या चेहर्यावर चिंतेचे सावट निर्माण झाले होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ही चिंता दूर झाली आहे. सलग ४८ तासांपासून सर्वदूर पाऊस सुरू असल्याने जिल्हाभरातील नदी-नाले पुन्हा प्रवाहित झाले आहेत.
शहरी भागात जनजीवन विस्कळीत
गेले ४८ तास नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव या सर्वच तालुक्यांत सातत्याने पावसाची रिपरिप सुरू आहे. विशेषत: नंदुरबार शहरात बुधवारी दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरला होता. यामुळे शहराच्या अनेक भागांत सखल भागात पाणी साचले होते. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांचे हाल होताना दिसून आले. सतत सुरू असलेल्या सततची रिपरिप आणि पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने Aसाहजिकच शहरी भागातील जनजीवनावर परिणाम झाला होता.



