Uncategorized

केळीचा दर निम्‍म्‍यावर, हजार रुपयांनी उतरला भाव, युद्धाचा परिणाम; नंदुरबार जिल्‍ह्यातील उत्‍पादक रडकुंडीला

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : इराण–अमेरिका युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तणावाचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही दिसू लागला असून, त्याचा फटका थेट नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या आठवडाभरात केळीच्या बाजारभावात क्‍विंटलमागे तब्‍बल एक हजार रुपयांची घसरण झाली असून, जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांचे चेहरे रडवेले झाले आहेत.
मागील आठवड्यात बाजारात केळीला सुमारे २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र, गेल्‍या आठवडाभरापासून अचानक केळीच्‍या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून, सध्‍याच्‍या घडीला हे दर १२०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दरातील जवळपास हजार रुपयांची ही घसरण केळी उत्पादकांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. अनेक शेतकर्‍यांच्‍या आर्थिक उत्‍पन्नाचा मुख्‍य स्‍त्रोत केळी उत्पादन हाच आहे. मात्र, सध्या केळीचे दर अपेक्षेच्‍या तुलनेत निम्‍म्‍यावर आल्‍याने या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
व्यापारी व बाजारातील जाणकारांच्या मते, युद्धाच्‍या पार्श्वभूमीवर बदललेल्‍या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे केळीच्‍या निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, साहचिकच  त्‍याची परिणिती स्‍थानिक बाजारतही दिसून येत आहे. केळीचा पुरवठा वाढलेला असतानाच निर्यात मंदावल्याने परिणामी केळीच्‍या दरात मोठी घसरण झाली आहे.
शेतकऱ्यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, खत, औषधे, मजुरी, सिंचन तसेच वाहतूक खर्च यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात केळीला मिळणारा दर मात्र अचानक कोसळल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी कर्ज काढून केळीची लागवड केली असून, सध्याच्या दरात माल विकावा लागल्यास खर्चही निघणे कठीण होणार असल्याची भीतीही या केळी उत्‍पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केली.
दरम्यान, केळीच्या दरातील घसरण थांबवण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. केळी उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी अनुदान, बाजार स्थिरीकरण उपाययोजना किंवा खरेदीची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. सध्या तरी बाजारभावातील या घसरणीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून परिस्थिती लवकर सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button