Uncategorized

धडगावात ‘विचित्र’ बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश; बारावी पास असूनही करीत होता रुग्‍णांवर इलाज; आरोग्‍य यंत्रणेला पत्ताच नव्‍हता, तरुण गावकर्‍यांनी दिले पकडून

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यात आरोग्‍य यंत्रणेच्‍या नाकावर टिच्‍चून बोगस डॉक्‍टरांकडून आदिवासी जनतेच्‍या आरोग्‍याशी खेळ सुरू असल्‍याचा आणखी एक धक्‍कादायक प्रकार धडगाव तालुक्‍यात उघडकीस आला आहे. सातपुड्याच्‍या दुर्गम भागात वसलेल्‍या या तालुक्‍यातील गुंडाचापाडा गावात या कोणत्‍याही वैद्यकीय पदवीविना रुग्‍णांवर उपचार करणार्‍या बोगस डॉक्‍टरचा गावकर्‍यांनीच पर्दाफाश केला आहे. आता गावकर्‍यांनी या बोगस डॉक्‍टरचा खेळ खल्‍लास केल्‍यानंतर आरोग्‍य यंत्रणेला जाग आली असून, या बोगस डॉक्‍टरवर कारवाई सुरू करण्‍यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, विचित्र बाबू मंडल असे पकडले गेलेल्‍या या बोगस डॉक्‍टरचे नाव असून, तो मुळचा पश्‍चिम बंगालमधील रहिवाशी आहे. विचित्र नावाचा बंगाली व्‍यक्‍ती ‘मुन्‍नाभाई’गिरी करीत असल्‍याचा संशय गावातील तरुणांना होता. या तरुणांच्‍या समूहाने मंगळवारी एकत्र येत थेट विचित्रचा दवाखाना गाठला. तेथे त्‍याला पकडून चौकशी केल्‍यावर त्‍याने आपण बारावी पास असून, डॉक्‍टर म्‍हणून रुग्‍णांची तपासणी करीत असल्‍याची कबुली दिली. तरुणांनी मागणी केल्‍यावर त्‍याने आपल्‍याकडे वैद्यकीय पदवी, नोंदणी आणि परवाना नसल्‍याचे कबुल केले.
झोपडीतच सुरू होता बोगस कारभार
गेल्‍या अनेक वर्षांपासून गुंडाचापाडा गावात राहणार्‍या विचित्रने आपल्‍या झोपडीवजा घरातच वैद्यकीय व्‍यवसाय थाटला होता. तेथेच तो रुग्‍णांची तपासणी करून त्‍यांच्‍यावर इलाज करीत असे. विचित्र रुग्‍णांची पाहणी करून त्‍यांना इंजेक्‍शन व औषधीही द्यायचा. विशेष म्‍हणजे या औषधांचा डोस तो स्‍वत:च तयार करायचा. गंभीर रुग्‍णांवरही तो याच ठिकाणी इलाज करायचा. मात्र, विचित्रच्‍या या गेल्‍या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्‍या बोगसगिरीचा जिल्‍ह्याच्‍या ‘जागरूक’ आरोग्‍य यंत्रणेला पत्ताच नव्‍हता., अशी माहिती पुढे आली आहे.
आरोग्‍य यंत्रणेची धावपळ
विचित्रची बोगसगिरी उघडकीस आणल्‍यावर गावातील तरुणांनी तातडीने जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांच्‍याशी संपर्क साधला. यानंतर डॉ. सोनवणे यांनी तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. कांतिलाल पावरा यांना गुंडाचापाडा येथे जावून ‘विचित्र’वर कारवाई करण्‍यास सांगितले. त्‍यानुसार त्‍याच्‍यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्‍यात आली.
दरम्‍यान, या प्रकरणामुळे जिल्‍ह्यात बोगस डॉक्‍टरांकडून आदिवासी जनतेच्‍या आरोग्‍याशी सुरू असलेल्‍या खेळाचा मुद्दा पुन्‍हा चर्चेत आला आहे. सोबतच त्‍याकडे जिल्‍हा आरोग्‍य यंत्रणेच्‍या होणार्‍या दुर्लक्षाने हा विषय गंभीर वळण घेण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button