Uncategorized

वाढत्‍या उन्‍हाचा नंदुरबार जिल्‍ह्यात पहिला बळी : नदीच्‍या डोहात सहा वर्षीय बालक बुडाला, धडगाव तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : मार्च महिना अर्ध्यावर आला नाही तोच उन्‍हाच्‍या झळा जीवघेण्‍या ठरत असून, उष्‍णतेचा पारा चाळीशीच्‍या पार जाताच नंदुरबार जिल्‍ह्यात वाढत्‍या उन्‍हाने पहिला बळी घेतला आहे. जिल्‍ह्याच्‍या धडगाव तालुक्‍यात सोन बुद्रुक येथे उन्‍हाचा चटका सहन न झाल्‍याने पाण्‍यात खेळणार्‍या सहा वर्षीय बालकाचा नदीच्‍या डोहात बुडून मृत्‍यू झाल्‍याची धक्‍कादायक घटना घडली.
धडगाव पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आर्यन ऊर्फ आश्‍विन पिंटा पावरा (६) असे बुडून मृत्‍यू झालेल्‍या चिमुकल्‍याचे नाव आहे. वाढत्‍या उन्‍हाचा चटका सहन होत नसल्‍याने आर्यन १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्‍या सुमारास सोन बुद्रुक गावातील नदीच्‍या डोहात पाण्‍यात खेळण्‍यासाठी गेला होता. यावेळी डोहातील पाण्‍याचा अंदाज न आल्‍याने तो गटांगळ्‍या खावू लागला आणि त्‍यातच त्‍याचा बुडून मृत्‍यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्‍थळी धाव घेत आर्यनला पाण्‍याबाहेर काढले. त्‍याला तातडीने धडगाव येथील ग्रामीण रूग्‍णालयात दाखल केले. तेथे डॉक्‍टरांनी तपासून त्‍याला मृत घोषित केले. या प्रकरणी आर्यनचे वडिल पिंटा चमार्‍या पावरा यांच्‍या माहितीवरून धडगाव पोलिस ठाण्‍यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button