गुड न्यूज : ‘एससी’ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती चौपटीने वाढणार; यंदापासूनच देणार सुधारित रक्कम

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अनुसूचित जाती प्रवर्गातील (एससी) शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने गुड न्यूज दिली आहे. या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या तुटपुंज्या शिष्यवृत्तीच्या रकमेत तब्ब्ल चौपट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही सुधारित वाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच देण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सतीश चव्हाण यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना शिरसाट यांनी शिष्यवृत्तीत वाढ करण्याच्या निर्णयाची घोषणा केली.
शिरसाट म्हणाले, सध्या एससी प्रवर्गातील पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ६० रुपये तर आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० रूपये याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. २००७ पासून ही रक्कम स्थिर असून, महागाईत प्रचंड वाढ झाली असताना शिष्यवृत्तीची रक्कम मात्र वाढलेली नाही, हे मान्य आहे. परंतु आता शिष्यवृत्तीची ही रक्कम आता ५ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये, तर ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे.
सामाजिक न्याय विभागाने या वाढीस तत्त्वतः मान्यता दिली असली तरी कोणताही आर्थिक निर्णय घेताना वित्त विभागाची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्यामुळे येत्या सोमवार किंवा मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त विभागाकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही मान्यता मिळताच या वर्षीपासून सुधारीत शिष्यवृत्ती लागू करण्यात येईल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.



