महाराष्ट्र

युद्धाचा फटका शिर्डीच्‍या साईबाबा संस्‍थानलाही; लाडू प्रसाद अनिश्‍चित काळासाठी बंद, भक्‍तांच्‍या जेवणातून एक भाजीही झाली कमी

शिर्डी (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेले हल्‍ले आणि ‍त्‍यानंतर आखातात पेटलेल्‍या युद्धाचा फटका शिर्डीच्‍या श्री साईबाबा संस्‍थानलाही बसला आहे. आखातातील युद्धामुळे जागतिक स्‍तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्‍थानने विक्रीसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात येणार्‍या लाडू प्रसादाचे उत्‍पादन अनिश्‍चित काळासाठी थांबवले आहे.
शिर्डीत श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी दररोज येणारे लाखो भाविक येतात. या भक्‍तांना संस्‍थानच्‍या वतीने प्रसाद म्‍हणून लाडूची विक्र केली जाते. साईभक्‍तांना प्रत्‍यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने या लाडूची खरेदी करता येते. मात्र, पुढील अनिश्‍चित काळासाठी लाडूची विक्री थांबवण्‍यात आली आहे. आगामी रामनवमी उत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर गॅसचा साठा जपून वापरासाठी संस्‍थानने हा निर्णय घेतला असल्‍याचे सांगण्‍यात आले.
दुसरीकडे, शिर्डीतील श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने चालविण्‍यात येणारे प्रसादालय हे सौर ऊर्जा संचलित आशियातील सर्वांत मोठे प्रसादालय मानले जाते. श्री साईंच्‍या दर्शनासाठी येणार्‍या भक्‍तांना या ठिकाणी प्रसाद म्‍हणून भोजनाची सोय करण्‍यात आली आहे. मात्र, आता इंधन तुटवड्याच्‍या पार्श्वभूमीवर संस्‍थाने येथील जेवणाच्‍या मेन्‍यूमध्‍ये बदल केला असून, भाविकांच्‍या जेवणातून एक भाजी कमी करण्‍यात आली आहे. याशिवाय संस्‍थानने उद्यापासून प्रसादालयात डिझेलवर चालणार्‍या शेगड्या चालू करण्‍याचे ठरवले आहे. दरम्‍यान, प्रसादाच्‍या लाडूचे वितरण बंद करण्‍यात आले असले तरी भाविकांना दिला जाणारा बुंदीप्रसाद मात्र सध्‍या सुरू आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button