मुख्य बातम्या

याहा मोगी देवी मंदिर परिसराचा विकास रोखू देणार नाही : हिना गावित; म्‍हणाल्‍या, वनकायद्याचे सगळे अडथळे दूर करू

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्‍या याहा मोगी देवी अर्थात देवमोगरा माता मंदिर परिसराचा विकास रोखला देऊ जाणार नाही. या विकासात अडथळा ठरणार्‍या वनखात्‍याच्‍या कायद्यांचा अडसर दूर करण्‍यासाठी दिल्‍लीतील भाजपच्‍या वरिष्‍ठ पदाधिकार्‍यांशी चर्चा करून तोडगा काढण्‍यात येईल, अशी ग्‍वाही माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिली आहे.
देवमोगरा देवीचे मंदिर गुजरातेतील डेडीयापाडा येथे आहे. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्‍या प्रकृतीत सुधारणा व्‍हावी, यासाठी त्‍यांच्‍या कन्‍या. डॉ. हिना गावित यांनी या मंदिरात जावून प्रार्थना केली. यानंतर त्‍यांनी माता मंदिराच्‍या विश्‍वस्‍तांसोबत चर्चा केली.
देवमोगरा मातेच्‍या दर्शनासाठी महाराष्‍ट्रासह गुजरात व मध्‍यप्रदेशातून भाविक येतात. शेकडो किलोमीटरवरून देवीच्‍या दर्शनासाठी पायी वारी करणार्‍या या भाविकांच्‍या निवासाच्‍या दृष्‍टीने डेडीयापाडा येथे महाराष्‍ट्र भवन उभारणीसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, वनविभागाच्‍या जमिनीशी संबंधित कायद्यामुळे हे भवन उभारण्‍यात अडचणी येत आहेत. ही अडचण मंदिराच्‍या विश्‍वस्‍तांनी डॉ. गावित यांच्‍या कानावर घातली. या अनुषंगाने आपण केंद्र सरकारचे सहकार्य मिळवून ही अडचण दूर करण्‍याचा प्रयत्‍न करू, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले. यावेळी डॉ. गावित यांनी मंदिर परिसरातील उपलब्‍ध सोयी-सुविधा, विकासकामे यांची माहिती विश्‍वस्‍तांकडून घेतली.
यावेळी मंदिर विश्‍वस्‍त मंडळाचे उपाध्‍यक्ष कांतीभाई कोठारी, गुरुजी दिलीप वसावा, सचिव नानसिंग वसावा, भाजपचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष नागेश पाडवी, माजी जि.प. सदस्‍य किरसिंग वसावे, भाजपचे माजी तालुकाध्‍यक्ष नितेश पाडवी, अमृत पाडवी यांच्‍यासह पक्षाचे स्‍थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्‍थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button