ट्रकच्या धडकेनंतर टँकर उलटला; दोन जखमी, सुदैवाने बचावले जीव, अक्कलकुवा – तळोदा मार्गावर भीषण दुर्घटना
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अक्कलकुवा ते तळोदा मार्गावर झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा जीव केवळ दैव बलवत्तर असल्यामुळे बचावला. अहमदाबाहून हैदराबादकडे जाणार्या कंटेनरला समोरून येणार्या ट्रकने धडक दिल्याने कंटेनर रस्त्याला कडेला उलटून झालेल्या दुर्घटनेत कंटेनर चालकासह त्याचा सहकारी जखमी झाला. कंटेनर उलटूनही या दोघांना गंभीर जखमा न झाल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान, धडक देणार्या ट्रकच्या चालकाविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर महादूराव पारधी (४०) व संतोष आनंदसिंग ठाकूर (दोघेही रा. आटकाळी, ता. बिलोली, जि. नांदेड) अशी जखमींची नावे आहेत. दिगंबर पारधी हा पीव्हीसी पाईपने भरलेला कंटेनर (क्र. एमएच २६ सीएच ४१०३) घेऊन अहमदाबाद येथून हैदराबादकडे निघाला होता. गुजरातेतील डेडियापाडा येथून अक्कलकुवामार्गे तळोदाकडे जाताना हॉटेल तनुश्रीजवळ पुलानजीक तळोद्याकडून विरूद्ध दिशेने येणार्या ट्रकने (क्र. जीजे १६ डब्ल्यू ७४९९) ने त्यांच्या कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कंटेनर रस्त्याच्या बाजूला जावून उलटला व त्याने पलट्या खाल्ल्या.
या अपघातात दिगंबर पारधी याला उजव्या व डाव्या पायास तसेच छातीला जोरदार मार लागला. तर संतोष याचे उजव्या हाताचे मनगट दुखावले. कंटेनर उलटल्यामुळे त्यात भरलेल्या पीव्हीसी पाइपचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध घेतला जात असून, प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खरात करीत आहेत.



