गुन्हे वार्ता

हपापाचा माल गपापा : बँक खात्‍यात आलेले दुसर्‍याचे पैसे उडवणारे आणखी तिघे अडकले, नंदुरबार जिल्‍ह्यात ’म्‍यूट’ खात्‍यातील रक्‍कम वापरण्‍याचे प्रमाण वाढले; आतापर्यंत आठ जणांवर गुन्‍हे

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यात बँकांतील म्‍यूट अर्थात दीर्घकाळ बंद असलेल्‍या खात्‍यांमध्‍ये पैसे टाकून ते परस्‍पर वळवणार्‍या सायबर ठगांचे कारनामे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. अशाच पद्धतीने आपल्‍या बँक खात्‍यात अचानक आलेली दुसर्‍याचीच रक्‍कम बँकेला कल्‍पना न देता परस्‍पर काढून खर्च करणार्‍या आणखी तिघांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याने खळबळ उडाली आहे. विशेष म्‍हणजे आतापर्यंत असे आठ गुन्‍हे उघडकीस आल्‍याने सायबर गुन्‍हेगारांचे जाळे लांबपर्यंत असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.
बँकांतील म्‍यूट खात्‍यात पैसे टाकून नंतर ती रक्‍कम काढून गंडा घालणार्‍या सायबर गुन्‍हेगारांच्‍या मागे सध्‍या नंदुरबार पोलिस लागले आहेत. अशातच आपल्‍या बँक खात्‍यात अचानक आलेली रक्‍कम बँकेला न कळवता परस्‍पर काढून उधळपट्टी करणारी प्रकरणे पोलिस उघडकीस आणत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अशी दोन प्रकरणे समोर आल्‍यानंतर दोन जणांवर गुन्‍हा दाखल केला होता. त्‍यानंतर आता अशाच आणखी तीन प्रकरणांचा पर्दाफाश झाला असून, असे कृत्‍य करणार्‍यांवर पोलिसांनी गुन्‍हे दाखल केले आहेत.
नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात या संदर्भात शुक्रवारी (दि. २४) दोन फिर्यादी दाखल झाल्‍या. यातील पहिल्‍या फिर्यादीनुसार, शहादा येथील अरबाज आरिफ धनानी कोटक महिंद्रा बँकेतील खात्‍यावर ११ मार्च २०२३ रोजी १ लाख ६२ हजार रुपयांची रक्‍कम अचानक जमा झाली होती. ही रक्‍कम सायबर ठगांनी त्‍याच्‍या खात्‍यावर टाकली होती. अचानक रक्‍कम आल्‍यानंतर त्‍याने याबाबत बँकेला कळवणे क्रमप्राप्‍त होते. मात्र, तसे न करता अरबाजने ती रक्‍कम परस्‍पर काढून खर्च करून टाकली. यामुळे त्‍याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. दुसरे प्रकरण
नंदुरबार शहरातच घडले. येथे ओम राकेश मराठे (रा. गुरुकुल नगर २, नंदुरबार) आणि भावेश मनोज मराठे या दोघांच्‍या स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या खात्‍यात २ जानेवारी २०२६ रोजी ५२ हजार ७१३ रुपयांची रक्‍कम अचानक जमा झाली होती. या दोघांनी सायबर खात्‍याकडे तक्रार किंवा बँकेला न कळवता सदर रक्‍कम खात्‍यातून काढून परस्‍पर खर्च करून टाकली. ही बाब लक्षात येताच या दोघांवरही उपनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
तिसरे प्रकरणही नंदुरबार शहरातच घडले. शहादा येथील परियानी साजिद रहीमभाई यांच्‍या नंदुरबारच्‍या परदेशीपुरा भागातील एचडीएफसी बँकेच्‍या खात्‍यात अचानक १ लाख १५ हजार रुपयांची रक्‍कम जमा झाली होती. त्‍यानेही बँकेला न कळवता ही रक्‍कम खात्‍यातून काढून खर्च केली. त्‍याच्‍याविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने बँक खात्‍यात आलेली अनामिक रक्‍कम बँकेला न कळवता खात्‍यातून काढून खर्च करून टाकणार्‍या दोघांविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. सध्‍या असा गुन्‍हा करणार्‍यांविरोधात मोहिम सुरू असून, येत्‍या काही दिवसांत आणखी काही जणांवर कारवाई होणार असल्‍याचे सांगण्‍यात येते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button