गुन्हे वार्ता

कौलारू घरात सुरू होती बनावट देशी दारूची निर्मिती, एलसीबीला कळलं अन्‌ खेळ खल्‍लास; दुगलीबारीपाड्यात धाड, १० लाखांच्‍या मुद्देमालासह एकाच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

म्‍हसावद (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने अवैध दारू निर्मितीविरोधात मोहीम उघडली असतानाच आता नंदुरबार पोलिसांनीही या मोहिमेत तेवढ्याच ताकदीने सहभाग नोंदवत सातपुड्याच्‍या पायथ्‍याशी मोठी कारवाई केली आहे. म्‍हसावद पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत दुगलीबारीपाड्यात स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) ही धडाकेबाज कारवाई करीत स्‍पिरीटपासून तयार करण्‍यात येणार्‍या बनावट देशी दारूचा कारखाना उद्‍ध्‍वस्‍त केला. यात एकाच्‍या मुसक्‍या आवळतानाच त्‍याच्‍याकडून तब्‍बल १० लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला.
दुगलीबारापाड्यात एका कौलारू घरात स्‍पिरीटचा वापर करून बनावट दारूची निर्मिती करण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हा पोलीस अधीक्षक अश्‍विनी सानप व एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. यानंतर त्‍यांनी तातडीने एलसीबीच्‍या पथकाला कारवाई करण्‍याच्‍या सूचना केल्‍या.
या आदेशानुसार एलसीबीच्‍या पथकाने तातडीने दुगलीबारीपाड्यात धडक देत संबंधित ठिकाणी छापा मारला. यावेळी एका कौलारू घरात स्‍पिरीटपासून देशी दारू तयार करण्‍यात येत असल्‍याचे आढळले. यावेळी पोलिसांनी लक्ष्‍मण हाल्‍या पाडवी (३१, रा. तलावडी, ता. धडगाव) याला ताब्‍यात घेतले. तसेच घराची झाडाझडती घेतल्‍यावर त्‍या ठिकाणी अवैध बनावट दारू, ही दारू बनविण्‍यासाठी लागणारे स्‍पिरीट, व अन्‍य साहित्‍य आढळले. पोलिसांनी १ लाख ५६ हजारांची बनावट देशी दारू, १ लाख रुपये किमतीचे १५० लिटर स्‍पिरीट, दारूच्‍या बाटल्‍यांसाठी लागणारे बूच पॅकिंग करणारे मशीन तसेच ७ लाख रुपये किमतीचे वाहन (क्र. एमएच ३९ जे ०९४४) असा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्‍त केला. या प्रकरणी लक्ष्‍मण हाल्‍या पाडवी याच्‍याविरोधात म्‍हसावद पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक करण्‍यात आली.
यांनी केली कारवाई…
पोलीस अधीक्षक अश्‍विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, हवालदार मुकेश तावडे, सुनील येलवे, दिनेश चित्ते, विशाल नागरे, जितेंद्र पाडवी, पुरुषोत्तम सोनार, चेतन साळवी, विनोद पाटील, मनोज महाजन, अभय राजपूत आदींच्‍या पथकाने ही कारवाई केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button