नंदुरबार जिल्हा

वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात शहादाकरांमध्‍ये संताप; अवास्तव वीजबिले येत असल्‍याची तक्रार, चौकशीची मागणी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहर व परिसरात महावितरण कंपनीविरोधात वीज ग्राहकांची नाराजी वाढत असून, विशेषत: अनेक वीज ग्राहकांकडून अवास्तव वीजबिले, तक्रारींची दखल न घेणे आणि ग्राहकांशी असमाधानकारक वागणूक याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्‍यात येत आहे. वाढीव वीजबिलांमुळे सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबे तसेच सौरऊर्जा प्रकल्पधारक ग्राहक आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शहादा येथील लक्ष्मण हिरालाल कदम यांनी दिलेल्‍या निवेदनानुसार, प्रत्यक्ष वीज वापर कमी असतानाही काही ग्राहकांना हजारो रुपयांची बिले प्राप्त होत आहेत. विशेषतः घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांनाही मोठ्या रकमेची वीजबिले येत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी वीजमीटर तपासणी, बिलातील युनिट नोंदी आणि अंदाजे आकारणीच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
वीजबिलांबाबत तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर ग्राहकांच्‍या समस्यांचे समाधानकारक निराकरण होत नाही, असेही निवेदनात म्‍हटले आहे. याशिवाय काही तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच लेखी तक्रारींवर वेळेत कार्यवाही होत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजमीटर तपासणी, वीजबिलांचे स्वतंत्र लेखापरीक्षण, प्रलंबित तक्रारींचा निपटारा आणि ग्राहकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची मागणी केली आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहादा येथील परिस्थितीची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्राहक संघटनांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन संयुक्तपणे पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली आहे. नागरिकांनीही आपापल्या तक्रारी लेखी स्वरूपात नोंदवून कायदेशीर मार्गाने न्याय मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्‍यान, या तक्रारींच्‍या अनुषंगाने अद्याप तरी महावितरणच्‍या वतीने कोणतीही प्रतिक्रिया किंवा स्‍पष्‍टीकरण देण्‍यात आलेले नाही.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button