प्रकाशात भाविकांसह पर्यटकांची ‘काशी’; श्री केदारेश्वर मंदिर परिसरातील स्वच्छतागृह, चेंजिंग रुम बंद; कोट्यवधींचा खर्च करून उभारलेली वस्तू ठरतेय ‘शो-पीस’!

प्रकाशा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथे दर्शनासह परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येणार्या भाविका आणि पर्यटकांना सोयीपेक्षा गैरसोयींनाच अधिक सामोरे जावे लागत असल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. प्रकाशातील श्री केदारेश्वर मंदिर परिसरात पर्यटन विभागाने बांधलेले स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत पडले आहे. शासनाने भाविकांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारलेली ही वास्तू केवळ ‘शो-पीस’ ठरत असून, यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रकाशा येथे दररोज हजारो भाविक धार्मिक विधी आणि दर्शनासाठी येतात. शिवाय परिसरात असलेल्या पर्यटनस्थळांच्या भेटीसाठीही वर्षभर पर्यटक येत असतात. तसेच सिंहस्थ कुंभमेळा उंबरठ्यावर असून, या निमित्तानेही भाविकांची मोठी गर्दी प्रकाशामध्ये होणार आहे. मात्र, विविध कारणांनी प्रकाशात येणार्या भाविकांना सध्या तरी अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी मुक्कामी राहण्यासह स्नान करणार्या भाविकांसाठी स्वच्छतागृह आणि महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम बांधण्यात आले असले तरी या दोन्ही सोयीच्या बाबी बंदच राहत असल्यामुळे या सर्वांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.ही वास्तू बंद असल्याने महिला भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना उघड्यावर किंवा आडोशाचा शोध घेत कपडे बदलावे लागत आहेत.
”कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर सुविधा बंदच ठेवायच्या होत्या, तर हा निधी वाया का घालवला?” असा संतप्त सवाल भाविक करत आहेत. पर्यटन विभागाने या सुविधेचे कुलूप त्वरित उघडून ती भाविकांसाठी खुली करावी, अशी मागणी आता होत आहे.



