शहादा बसस्थानक गुंडांचा अड्डा, सुविधांचीही बोंब; शिवसेना भडकली, निवेदन देऊन म्हणाले, कारभार सुधारा अन्यथा मोठे जनआंदोलन उभारणार

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा बसस्थानक आणि परिसरात वाढती गुंडगिरी, माथेफिरूंकडून विद्यार्थीनींची काढली जाणारी छेड यासह बसस्थानकातील दुरवस्थेबाबत शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी या संदर्भात आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन या समस्यांवर तातडीने उपाययोजना न केल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला.
शहादा बसस्थानक व परिसरातून महिला व पुरुष प्रवाशांचे अनमोल दागिने व रोख रक्कम चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. शिवाय बस आगार गुंडांचा अड्डा बनला असून, टवाळखोर व माथेफिरू मुलांकडून शाळेतील विद्यार्थीनींची छेड काढण्याचे प्रकार सुरू आहेत. या बाबींना कायमस्वरूपी आळा बसण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे. एवढेच नाही तर बस आगारातील दुरवस्थेकडेही या निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांचे लक्ष वेधण्यात आले. बसस्थानकात मोठ-मोठे खड्डे असल्याने लहान मुलांसह जेष्ठांना गाडीत चढताना व उतरताना त्रास सहन करावा लागतो. परिणामी छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना नेहमीच घडत आहेत. यावर तातडीने पर्याय काढावा अन्यथा भविष्यात या समस्येमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला शहादा बसआगार जबाबदार राहील व दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशाच्या औषधोपचाराचा खर्च शहादा बस आगाराला करावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे दिला.
यावेळी जमदाडे यांच्यासह तालुका पमुख मनलेश जायसवाल यांनी धुळे बस आगारातील वरीष्ठ अधिकार्यांशी मोबाईलवर संपर्क करुन संवाद साधला. यानंतर येत्या ८ दिवसांत शहादा बस आगारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह पावसाळ्यापूर्वी बस आगारातील सर्व खड्डे बुजविण्याचे आश्वासन संबंधित अधिकार्यांनी जमदाडे व जायस्वाल यांना दिले. यावेळी या दोघांनीही पुढील दहा दिवसांत ही कामे न झाल्यास शिवसेना प्रवाशांच्या साथीने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला.



