नंदुरबार जिल्हा

“धोंड्या धोंड्या पाणी दे साय माय पिकू दे” : शहाद्यातील माता-भगिनींचे घरोघरी फिरून वरुणराजाला साकडे

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : पावसाळा अर्धा सरला तरी शहादा तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळाचे सावट गडद होत असताना आता पावसासाठी शहरातील महिलाही पुढे सरसावल्या असून त्यांनी थेट वरुणराजाला साकडे घातले आहे.
शहरातील डोंगरगाव रोड परिसरातील हरिओम नगर, शांती विहार कॉलनी, महावीर नगर आणि गौरीशंकर नगर या चारही कॉलनीतील महिलांनी आज भर दुपारी उन्हाची तमा न बाळगता हातात टाळ-मृदंग घेत देवाचे भजन गात घरोघरी फेरी काढली.
“धोंड्या धोंड्या पाणी दे साय माय पिकू दे”, “पाऊस दे रे देवा, शेतकऱ्याला पावसात भिजू दे”, “पाणी हेच जीवन” यासह विविध भजनांच्या आणि ओव्यांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिलांनी प्रत्येक घरासमोर थांबून पावसासाठी प्रार्थना केली. ही पारंपरिक मान्यता आहे की महिला अशा प्रकारे घरोघरी फिरून भिक्षा मागतात आणि देवाला आळवतात तेव्हा इंद्रदेव प्रसन्न होऊन वरूणराजा बरसतो.
भूजल पातळीत मोठी घट
गेल्या वर्षीही तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यंदा जुलै महिना अर्ध्यावर संपत आला तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वातावरण तयार होते पण गळतीच लागत नाही. कोकिळ शिडकाव्याशिवाय पावसाचा थेंब नाही. धरणे, नाले, विहिरींमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. शेतात पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांनी हा आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.
यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ महिला तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कॉलनीतील पुरुषांनीही त्यांना सहकार्य केले. फेरीदरम्यान अनेक घरांमधून महिलांना हळद-कुंकू, अक्षता देऊन त्यांच्या प्रार्थनेला साथ देण्यात आली.
“शेती जगली तर आम्ही जगू. पाऊस नाही तर सर्वच ठप्प होईल. म्हणून आम्ही आमच्या लेकरांसाठी, शेतासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी देवाकडे पावसाचे साकडे घातले आहे,” अशी भावना एका महिलेने व्यक्त केली.
महिलांच्या या श्रद्धा आणि एकजुटीचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून आता त्यांच्या हाकेला वरुणराजा कधी ओ देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button