‘बेंदा’ची भलतीच ‘कामगिरी’, प्रकाशातील पुलाच्या कामासाठी केली वीज चोरी; महावितरणने ठोठावला ७९ हजारांचा दंड, पण महिना उलटला तरी पैसे भरेना!

प्रकाशा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गोमाई नदीवरील पुलाच्या कामासाठी अधिकृत वीज मीटर घेवूनही त्यावर पोट भागत नसल्याने या कामाचे कंत्राट घेतलेल्या बेंदा कंपनीने चक्क वीज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर महावितरणने सदरील कंपनीला तब्बल ७९ हजारांचा दंड ठोठावला असला तरी तब्बल महिना उलटल्यानंतरही ‘बेंदा’ कंपनीने दंडाची रक्कम न भरता दांडगाई केल्याचे समोर आले आहे.
गोमाई नदीवरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू असून, या कामाचे कंत्राट बेंदा कंपनीला मिळालेले आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात वीजेची आवश्यकता असल्याने कंपनीने महावितरण कंपनीकडून अधिकृत वीज मीटर घेतलेले आहे.
अधिकृत वीजपुरवठा सुरू असूनही बेंदा कंपनीने चोरट्या मार्गाने वीजेचा वापर सुरू केला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर महावितरण कंपनीच्या वतीन सहायक अभियंता शीतल पाडवी यांनी तातडीने पुलाच्या कामाच्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली होती. त्यात वीजचोरीचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर पाडवी यांनी बेंदा कंपनीला ७९ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला.
हा प्रकार घडून महिना उलटला असला तरी बेंदा कंपनीच्या वतीने आतापर्यंत दंडाची रक्कम भरण्यात आलेली नसल्याचे महावितरणमधील सूत्रांकडून समजते. असे करून बेंदा कंपनी आपण कुणालाही जुमानत नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, आता महावितरणने या कंपनीवर कडक कारवाईचा निर्णय घेतला असून, आता महावितरण पुढील बिलात दंडाची रक्कम लावून बेंदा कंपनीकडून सर्व रक्कम वसूल करणार आहे, अशी माहिती सहायक अभियंता शीतल पाडवी यांनी दिली.



