नंदुरबार जिल्हा

शहाद्यातील चावरा इंग्लिश स्कूल वादाच्या भोवऱ्यात; विद्यार्थ्यांचा छळ व आर्थिक गैरप्रकारांची तक्रार, आता सखोल चौकशी सुरू

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या चावरा इंग्लिश स्कूल विरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्यानंतर संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’च्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रारींमध्ये गंभीर आरोप
अ. भा. ग्राहक पंचायतीचे शहादा तालुका अध्यक्ष अनिल भामरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात शाळेच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश ठरावीक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. सर्व व्यवहार रोख रकमेनेच करून पावती न देण्याची पद्धत अवलंबली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली पालकांकडून सक्तीने पैसे वसूल केले जातात. पैसे न दिल्यास विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण कमी करण्याची धमकी दिली जाते. नियमबाह्य फी आकारणी, मानसिक छळ आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष अशा बाबीही तक्रारीत नमूद आहेत.
शासन नियमांचे उल्लंघन?
शासन निर्णय दि. ११ जून २००४ व १ जुलै २०२५ नुसार कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदी करण्यास भाग पाडता येत नाही. मात्र, चावरा इंग्लिश स्कूलमध्ये या नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
शिक्षण विभागाचा कडक पवित्रा
नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शहादा येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्व तक्रारींची वस्तुनिष्ठ आणि सखोल तपासणी करून २१ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात कोणतेही स्मरणपत्र दिले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांमध्ये संतापाचे वातावरण
या प्रकरणामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक पालकांनीही या तक्रारींना दुजोरा दिल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत तसेच आर्थिक शोषणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पुढील कारवाईकडे लक्ष
आता येत्या २१ एप्रिल रोजी सादर होणाऱ्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेची गय केली जाणार नाही. तक्रारीत तथ्य आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
– वंदना वळवी (प्रभारी शिक्षणाधिकारी, जि.प. नंदुरबार)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button