नंदुरबार जिल्हा

शहाद्याच्‍या लांबोळात कोट्यवधी खर्चून उभारलेली संरक्षण भिंत कोसळली; पं.स.च्‍या बांधकाम विभागाच्‍या खाबुगिरीचे पितळ उघडे पडले!; निकृष्ट कामाचा संशय

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लांबोळा येथे जिल्‍हा नियोजन व विकास समितीच्‍या मंजुरीनंतर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या काही महिन्‍यांतच ही भिंत मातीशी एकरूप झाल्‍याने पंचायत समितीच्‍या बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले असून, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत लांबोळा येथे संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच भिंत कोसळल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या कामात संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अभियंता यांच्यात संगनमत झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या निधीचा अपव्यय करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप होत असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा घटनांमुळे मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागात सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. आता प्रशासन या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि दोषींवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button