केवायसीचा चटका, लाडक्या बहिणींना झटका; नंदुरबार जिल्ह्यातील दोन हजारावर बहिणी ठरल्या अपात्र; महिन्याचे १५०० रुपये बंद, वरून गेल्या दोन वर्षांतील लाभाची होणार वसुली
नंदुरबार (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेल्या (केवायसी) अपयशाचा नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल दोन हजारांहून अधिक महिलांना बसला असून, या सर्व महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. अर्थात, एवढ्यावरच न थांबता राज्य सरकार आता या अपात्र लाडक्या बहिणींकडून गेल्या पावणेदोन वर्षांत घेतलेल्या लाभाचे पैसे देखील वसूल करणार असल्याने या महिलांची दुहेरी अडचण होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अनेक अपात्र महिलांनी घुसखोरी करून गैरफायदा घेत योजनेचे पैसे लाटल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. यानंतर राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींनी सादर केलेल्या कागदपत्रांनी पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता.
यात प्रशासनाने इ-केवायसी प्रक्रियेसोबतच त्यांची बँक खाती, आधार लिकिंग आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाची कसून तपासणी करण्यात आली. अर्थात, इ-केवायसी प्रक्रियेसाठी वारंवार संधी देवूनही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरल्या. यात नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल दोन हजारांहून अधिक महिलांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे वारंवार संधी देवूनही या महिलांनी इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याचा फटका या महिलांना बसला आहे.
आणखी एक झटका
इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे या दोन हजारांवर लाडक्या बहिणींचा १५०० रुपये महिलांचा लाभ तर बंद होणारच आहे, परंतु हे प्रकरण एवढयावरच न थांबता या महिलांना दुहेरी झटका बसणार आहे. कारण आता अपात्र ठरलेल्या या महिलांनी गेल्या पावणेदोन वर्षांत घेतलेले लाभाचे पैसे पण परत करावे लागणार आहेत. अशी वसुली करण्याचा निर्णयच राज्य सरकारने घेतला आहे. शिवाय त्यांना इ-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदत देखील जाणार नाही. एवढेच नव्हे तर अनेक पुरूषांनीही बनावट कागदपत्रांचा आधार घेत व खोटी माहिती देवून या योजनेचे पैसे लाटल्याचे प्रकार समोर आले होते. या सर्वांकडून घेतलेल्या लाभाचे पैसे तर वसुल केले जाणार आहेत, पण सोबतच त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.



