शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना भाजपकडून नमन; पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नंदुरबार शहरात उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले.
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी, लोककल्याणकारी शासनव्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवरायांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे असून, युवकांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात नगर पालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, नगरसेवक लक्ष्मण माळी, नगरसेवक पंकज चौधरी, भाजप शहराध्यक्ष नरेश कांकरिया, माजी नगरसेवक संतोष वसईकर, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माणिक माळी, माजी नगरसेवक प्रकाश भोई, सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे, हरमेश ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांनी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



