गुन्हे वार्ता

नंदुरबारच्‍या मंदिरात केलेली चोरी २४ तासही पचली नाही; १९ वर्षीय भामटा शहर पोलिसांच्‍या जाळ्‍यात; गुन्‍हे शाखेकडून ७१,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्‍त

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील रोकडेश्‍वर हनुमान मंदिर आणि श्री महारुद्रेश्‍वर शिवालय मंदिरात भर दुपारी २.३० वाजेच्‍या सुमारास तब्‍बल ७१ हजार ४०० रुपयांच्‍या ऐवजावर डल्‍ला मारणार्‍या १९ वर्षीय चोरट्याला अवघ्‍या २४ तासांच्‍या आत जेरबंद करण्‍यात नंदुरबार शहर पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखेला यश आले. या चोरट्याने चोरीची कबुली देतानाच चोरी केलेला ऐवज पोलिसांच्‍या हवाली केला.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १ जून रोजी भरदुपारी २.३० वाजेच्‍या सुमारास अज्ञात चोरट्याने नंदुरबार शहरातील रोकडेश्‍वर हनुमान मंदिर (कुंभार गल्‍ली) आणि श्री महारुद्रेश्‍वर शिवालय मंदिर (देसाईपुरा) या दोन मंदिरांत प्रवेश करून पितळाची घंटा, तांब्‍याची १६ किलो वजनाची नाग देवताची मूर्ती आणि एक दुचाकी असा एकूण ७१ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली होती.
थेट मंदिरांत चोरी झाल्‍याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास गुन्‍हे शाखेकडे सोपविण्‍यात आला होता. नंदुरबार शहर पोलिसांच्‍या गुन्‍हे शोध पथकाने तातडीने हालचाल करून परिसरातील सीसीटीव्‍ही फुटेज तपासतानाच गुप्‍त खबर्‍यांना चोरट्याला शोधण्‍याच्‍या कामी लावले होते. काही तासांतच गुप्‍त खबर्‍याने सदरील चोरी राहुल दिलीप पाडवी (१९, रा. नवनाथनगर, देसाईपुरा, भिलाटी) याने केल्‍याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करीत चोरट्याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. चौकशीत त्‍याने गुन्‍ह्याची कबुली देत चोरलेला ऐवज पोलिसांच्‍या हवाली केला. सध्‍या या प्रकरणाचा तपास हेड कॉन्‍स्‍टेबल नरेंद्र चौधरी करीत आहेत.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक अश्‍विनी सानप, अपर अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले, उपनिरीक्षक छगन चव्‍हाण, भुनेश मराठे, हेडकॉन्‍स्‍टेबल जगदीश पाटील, नरेंद्र चौधरी, कॉन्‍स्‍टेबल नरेंद्र पाडवी, राहुल राठोड, अमित भारवाड, रुपेश पगारे, ललित गवळी, विवेक ठाकरे, अनिल वसावे, विद्येश्‍वर बिरारी, महिला पोलीस कॉन्‍स्‍टेबल निंबाबाई वाघमोडे आदींच्‍या पथकाने केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button