तीन आठवड्यांपूर्वी कारवाईसाठी पत्र, तरीही शहाद्यातील अतिक्रमण जैसे थे; उपनगराध्यक्षा माधवी पाटील भडकल्या; मुख्याधिकारी, पोलिसांना पाठवले स्मरणपत्र!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वाढते अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, राँग साईड वाहतूक आणि अवजड वाहनांची घुसखोरी यामुळे संपूर्ण शहादा शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. या गंभीर समस्येकडे नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ मे रोजी मुख्याधिकार्यांना पत्र देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने शहादाच्या उपनगराध्यक्षा माधवी मकरंद पाटील संतापल्या आहेत. आता त्यांनी मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला स्मरणपत्र पाठवून तातडीने संयुक्त कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी १५ मे रोजी दिलेले पत्र गांभीर्याने न घेतल्याने पाटील यांनी हे स्मरणपत्र दिले आहे. शहरातील महात्मा फुले चौक ते श्रेयस हॉस्पिटल, स्टेट बँक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चार रस्ता ते सोनार गल्ली आणि महात्मा गांधी पुतळा ते बागवान गल्ली या चारही मुख्य मार्गांवर वाहतुकीची दुरवस्था झाली आहे. वन-वे रस्ते असूनही वाहनचालक राँग साईडने बिनधास्त वाहने चालवत आहेत. मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांचा प्रवेश सुरूच आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुद्द शहादा नगरपालिका कार्यालयासमोरच नॉनव्हेज व अंडाकरी विक्रेत्यांनी रस्त्यालगत व्यवसाय थाटल्याने तेथे दुर्गंधी , अस्वच्छता आणि कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यांवर आंबे, फळ, चप्पल, थंड पेये आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी अतिक्रमण केल्यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
व्यवसाय करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु सार्वजनिक रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरणे अयोग्य आहे. आजच योग्य पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मोठे अपघात घडू शकतात, याकडे माधवी पाटील पत्रातून संबंधितांचे लक्ष वेधले आहे. या स्मरणपत्राची दखल घेऊन प्रशासनाने काय पावले उचलली, याची लेखी माहिती त्वरित देण्याची मागणीही उपनगराध्यक्षांनी केली आहे. या पत्राची प्रत शहादा पोलीस निरीक्षकांनाही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.
उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी अतिक्रमणमुक्त शहादासाठी नगर पालिकेला सुचवलेल्या उपाययोजना अशा :
* सर्व हातगाडी व फेरीविक्रेत्यांची पाहणी करून त्यांच्यासाठी जागा निश्चित करावी.
* रस्त्याची एक साईड पट्टी पूर्णपणे क्लिअर करून तिथे शिस्तबद्ध दुचाकी पार्किंग करावी.
* डायमंड कॉर्नर परिसरातील बॅरिकेटिंगचे नियोजन बदलून टू-व्हीलरसाठी पर्यायी मार्ग मोकळा करावा.
* पोलीस व नगरपालिका प्रशासनाने एकत्रितपणे राँग साईड वाहतूक व अवैध पार्किंगवर दंडात्मक कारवाई करावी.



