जनता ‘गॅस’वर : सर्वसामान्यांना दणका; आजपासून घरगुती गॅस महागला, आणखी २९ रुपयांची वाढ; दरवाढीचे केंद्राकडून समर्थन तर काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई / नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दैनंदिन वापरातील वस्तूंसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात दिवसागणिक वाढ होत असतानाच आता केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात आता आणखी २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आजपासून (दि. ७) लागू करण्यात आली असून, यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील किचनचे बजेट कोलमडणार आहे.
गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत घरगुती गॅसच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. या दरवाढीमुळे राजधानी नवी दिल्लीत १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर २९ रुपयांच्या वाढीसह ९१३ रुपयांवरून ९४२ रुपये झाला आहे. देशातील इतर भागातही ही दरवाढ २९ रुपये इतकीच आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता नव्या दरवाढीमुळे मुंबईतही घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९१२.५० रुपयांहून ९४१.५० रुपये झाली आहे.
पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सामान्य माणूस आधीच मेटाकुटीला आला असताना एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीच भर पडणार आहे. एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्या अजूनही प्रत्येक घरगुती सिलेंडरमागे ७०३ रुपयांचा तोटा सहन करत आहेत. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात वाढ केली होती. १ जून रोजी कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरचे दर ४२ रुपयांनी वाढला होता. गेल्या पाच महिन्यात १९ किलोच्या सिलिंडरचे दर दुप्पट झाले आहेत. १ जानेवारीपूर्वी १९ किलोच्या सिलिंडरचा दर १,५८० रुपये होता. १ जूनला तोच दर ३,११३.५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थांचे दर वाढले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या चिंता वाढत आहेत. पेट्रोल-डिझेल, गॅस व अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे वाढलेल्या जागतिक ऊर्जा खर्चाचा भार सहन करण्यासाठी सरकारी तेल विपणन कंपन्या संघर्ष करत असल्याने भारतात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ केली गेली असली तरी सरकारने इंधन पुरवठादार कंपन्या अजूनही मोठा तोटा सहन करून ग्राहकांना कमी किमतीत इंधन उपलब्ध करून देत असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दुसरीकडे, काँग्रेसने नरेंद्र मोदी सरकारवर आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांवर अधिक भार टाकल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “‘महागाईवाला मोदी’ने पुन्हा एकदा चाबूक चालवला आहे. आता घरगुती गॅस सिलेंडर २९ रुपयांनी महाग झाला आहे. मोदींचा फॉर्म्युला स्पष्ट आहे, जनतेकडून लूटमार करा आणि श्रीमंत मित्रांची तिजोरी भरा.”



